मुंबई : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरुन राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. नवे पालकमंत्री म्हणून अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे.

प्रकाश मेहता यांच्यावर रायगड जिल्ह्यातील स्थानिक भाजप कार्यकर्त्यांची नाराजी होती. या नाराजीमुळेच प्रकाश मेहतांची उचलबांगडी झाल्याची चर्चा आहे.

प्रकाश मेहता हे राज्य मंत्रिमंडळात गृहनिर्माण मंत्रिपदावर आहेत, तर रविंद्र चव्हाण यांच्याकडे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान आणि ग्राहक संरक्षण या खात्यांचे राज्यमंत्रिपद आहे. त्यामुळे कॅबिनेट मंत्र्यांची उचलबांगडी करुन, त्या ठिकाणी राज्यमंत्र्यांची नियुक्ती केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांनाही उधाण आले आहे.

दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांसह रायगडवासियांचीही प्रकाश मेहता यांच्याबद्दल नाराजी होती. कारण स्वातंत्र्यदिन असो वा प्रजासत्ताक दिन, पालकमंत्री म्हणून प्रकाश मेहतांनी मुख्य कार्यक्रमांना उपस्थित राहण्याऐवजी दांडी मारली आहे. शिवाय सावित्री नदी दुर्घटनेवेळीही त्यांच्याविरोधात मोठी संतापाची भावना होती. खरंतर त्यावेळीच त्यांना पालकमंत्रिपदावरुन हटवण्याच्या मागणीने जोर धरला होता. अखेर त्यांची उचलबांगडी झाली.