Palghar News : तलासरी तालुक्यातील उधवा कुंभारपाडा येथील मधुकर चंद्रया दळवी हा आदिवासी युवक बांबूच्या लाकडाला विविध आकार आणि  रंगसंगतीच्या मिलाफातून वारली कलाप्रकारात विविध वस्तू साकारतो. त्या वारली चित्रकला आणि स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या आहेत. शासनाने आर्थिक पाठबळ आणि बाजारपेठ उपलब्ध केल्यास पाड्यावरच्या कलादालनातील उद्योनमुख कलाकारांना नाव व आर्थिक पाठबळ मिळेल.


पालघर जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अनेक आदिवासी कलाकारांनी वारली चित्रकला डोळ्यासमोर ठेवून विविध कला प्रकारात ठसा उमटवला आहे. मात्र अंगभूत कलागुण असूनही वेळ, पैसा आणि व्यासपीठ नसल्याने अनेक कलाकार काळाच्या पडद्याआड गेले. तलासरी या दुर्गम आदिवासी तालुक्यातील उधवा कुंभारपाडा येथील मधुकर चंद्रया दळवी या आदिवासी युवकाचे दहावी पर्यंत शिक्षण झाले आहे. तो उधवा आश्रम शाळेत सुरक्षारक्षक असून फावल्या वेळेत त्याने बांबूच्या लाकडांना विविध आकार देत, त्यावर कलाकुसर आणि रंगरंगोटी करून सुबक वस्तू बनविल्या आहेत. 


आदिवासी समाजातील असल्याने वारली संस्कृती, त्यातील विविध घटना, प्रसंग, वाद्ये, प्रेरणास्थाने, व्यक्तिमत्व इ. घटकांना कलेतून  मूर्तरूप दिले आहे. या संस्कृतीची ओळख सर्वांना व्हावी व कलेचा प्रचार-प्रसार व्हावा हा त्यामागचा त्याचा उद्देश आहे. आदिवासी संस्कृतीतील तारपा, ढोल वादक, काम करण्याऱ्या स्त्रीया-पुरुष, स्थानिक संस्कृतीतील चालीरीती इ. त्याच्या कलेतील मुख्य घटक आहेत. या वस्तूंना त्यांनी  थ्रीडी स्वरुपात अभिव्यक्त केल्या आहेत. स्थानिक परिसरात उपलब्ध बांबू आणि धारदार विळा, सुरी आदी साहित्याचा वापर करून घरातील एका खोलीत या वस्तू बनवतो. आज या खोलीला कलादालनाचे रूप आले असून त्याची कला पाहण्यासाठी अनेकजण भेट देतात. काही वस्तू नंदुरबार येथील संग्रहालयात पाठवल्याचे त्यांनी सांगितले.


दरम्यान जिल्ह्यातील आदिवासी कलाकारांनी बनविलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास अंगभूत कलेचा विकास व त्यांची आर्थिक सक्षमता वाढेल. ही कुडाच्या खोलीतील कलादालने पर्यटन व्यवसायाची जोडल्यास वारली संस्कृतीचा प्रचार- प्रसार होऊन हे कलाकार नावारूपाला येतील अशी भावना शिक्षक विनेश धोडी यांनी व्यक्त केली.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा