पालघर : पंतप्रधान मोदींनी इंधन दरवाढीसाठी राज्य सरकारांना जबाबदार ठरवल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वागण्यामुळे मी नाराज नसून हैराण आहे असा सुप्रिया सुळे यांनी खोचक शब्दांत टोला लगावला. पालघरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या.


सुप्रिया सुळे म्हणाल्या, “करोना स्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांसोबत चर्चा करून मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा असताना त्यांनी देशभरातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करताना इंधन दरवाढीसाठी सर्वस्वी राज्य सरकारांना जबाबदार ठरवलं. पंतप्रधानांच्या या वागण्यामुळे मी त्यांच्यावर नाराज नसून हैराण आहे. मी लोकसभेत आणि वैयक्तिक भेटल्यानंतरही तसं सांगितलं आहे".


आमचे पंतप्रधान सदासर्वकाळ राजकारणी
"पंतप्रधान पदावरील एक जबाबदार व्यक्ती म्हणून त्यांची चांगली वागणूक  सामान्यांना अपेक्षित आहे. त्याऐवजी आमचे पंतप्रधान सदासर्वकाळ राजकारणी म्हणून वागत असतात. ही गोष्ट निश्चितच खटकणारी आहे", असा खेद सुप्रिया सुळे यांनी पालघरमध्ये व्यक्त केला.


दरम्यान, कोरोनाबाबतच्या आढावा बैठकीमध्ये पंतप्रधानांनी राज्य सरकारांवर इंधन दरवाढीवरून टीका करणं दुर्दैवी असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. “कोरोनास्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांसोबत चर्चा करून मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा असताना त्यांनी मूळ विषयाला बगल दिली. कोरोना स्थितीसाठी राज्यांशी या विषयावर चर्चा करताना त्यांनी राज्य सरकारवर सर्व गोष्टी ढकलणे ही बाब दुर्दैवी होती",असे देखील सुळे म्हणाल्या.


खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “निवडणुकांमध्ये संघर्ष करा. भारताच्या पंतप्रधानपदी निवडून आल्यानंतर नैतिक जबाबदारी म्हणून मोदींनी राज्यांची मदत करणे आवश्यक आहे. असे असताना महाराष्ट्रावर ते सातत्याने करत असलेली टीका ही दुःखद आणि वेदना देणारी आहे. कोविड पसरवला, महागाई या विषयावर बोलून महाराष्ट्रविषयी ते करत असलेली बदनामी अस्वस्थ करणारी आहे”


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविडविषयक बैठकीत पेट्रोल आणि डिझेल वरील कराचा मुद्दा उपस्थित करून, राज्य सरकारमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर चढेच राहिले आहेत असा आरोप केला होता.