पालघर : पालघरमध्ये जिवंत बॉम्ब सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लष्कराने फेकलेला जिवंत बॉम्ब असल्याचा अंदाज आहे.


पालघर जिल्ह्यात वाडा तालुक्यातील देवळी गावात जिवंत बॉम्ब सापडला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लष्कराने केलेल्या सरावाच्या वेळी हा बॉम्ब फेकला असावा, असा अंदाज स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केला आहे. या बॉम्बची तपासणी बॉम्ब शोधक पथकाने केली आहे.

देवळी गावात महेंद्र पाटील यांची शेतजमीन असून त्यात बांधबंधिस्तीचं काम सुरु आहे. शेतात खोदकाम सुरु असताना अचानक एक लोखंडी वस्तू कामगारांना आढळली. पहिल्यांदा हा लोखंडाचा तुकडा असल्याचं त्यांना वाटलं. मात्र नीट पाहणी केली असता हा बॉम्ब असल्याचं लक्षात आलं. तात्काळ वाडा पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.

वाडा पोलिस आणि तहसीलदार यांनी घटनास्थळी पाहणी करुन पोलिस बॉम्ब शोधक व नाशक पथक ठाणे ग्रामीण यांना पाचारण करण्यात आलं. पथकाने सायंकाळी या बॉम्बची पाहणी केली. हा बॉम्ब जिवंत असल्याचा अंदाज व्यक्त करुन याबाबत लष्कराशी बोलून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असं सांगण्यात आलं.