पालघर : बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील (Palghar Boisar Tarapur blast) जखारिया लिमिटेड या कापड निर्मिती करणाऱ्या कारखान्यात शनिवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटात कारखान्यातील एका कामगाराचा मृत्यू झाला असून एक कामगार अजूनही बेपत्ता आहे. तर पाच कामगार जखमी आहेत. यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असून जखमींवर बोईसरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या स्फोटात मृत झालेल्या कामगाराचं नाव मिथिलेश राजवंशी असं आहे. तर  छोटे लाल सरोज हा कामगार बेपत्ता आहे.



कारखान्यातील बॉयलरचा भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर येत असून यामुळे कारखान्याला भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या  चार गाड्या घटनास्थळी दाखल होऊन जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. हा स्फोट झाल्यानंतर याची भीषणता इतकी होती की याचा आवाज चार ते पाच किलोमीटर परिसरामध्ये ऐकू आला.



या कंपनीतील स्फोटात अरविंद यादव, मुरली गौतम, अमित यादव, मुकेश यादव आणि उमेश राजवंशी हे कामगार जखमी झाले असून यातील तिघांची प्रकृती गंभीर आहेत.  तर एक कामगार अजूनही बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. ज्यावेळी स्फोट झाला त्यावेळी या कारखान्यात एकूण बारा कामगार कार्यरत होते.



या औद्योगिक कार्यक्षेत्रात सातत्याने असे मोठे अपघात घडत असून कुठेतरी सेफ्टी डिपार्टमेंट आणि संबंधित नियंत्रण विभागाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र समोर येत आहे. असे अपघात घडत असताना कामगारांचे नाहक जीव जात असून काही कामगारांना अपंगत्व ही येत आहे