पालघर : वाढलेले इंधनाचे दर आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती या साऱ्याचा सारासार विचार करुन पालघरमधील एका अवलियानं शेतीच्या मशागतीसाठी एक अविष्कार केला. पालघरमधील तलासरी कवाडे येथील रमण खरपडे या तरुणाने मोडकळीस आलेल्या M80 या मोटर सायकलपासून शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टर तयार केला आहे. याच ट्रॅक्टरच्या सहाय्यानं रमणने आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या शेतजमिनीची मशागत केली आहे.
तलासरी सारख्या दुर्गम भागातील रमण खरपडे आदिवासी तरुण. रमणनं तलासरी येथून कला शाखेतून आपली पदवी पूर्ण केली. त्यानंतर त्याने आपल्या वडिलोपार्जित जमीनित शेती करण्याचा निर्णय घेतला. मात्र चालू वर्षी पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ झाल्यानं ट्रॅक्टरची ताशी भाडेवाढ करण्यात आली. त्यामुळे शेतीसाठी ट्रॅक्टर भाड्यानं परवडत नाही. त्यातच ट्रॅक्टर खरेदी करण्याइतकी कुटुंबाची चांगली आर्थिक परिस्थिती नसल्यानं आपल्या वडिलांच्या मोडकळीस आलेल्या M80 या मोटरसायकलपासून शेतीच्या मशागतीसाठी त्यानं ट्रॅक्टर तयार करण्याचा निर्णय घेतला.
मोडकळीस आलेल्या मोटर सायकल पासून तयार केलेल्या ट्रॅक्टरच्या साह्यानं रमण आपली आणि कुटुंबाच्या शेतजमिनीची मशागत केली, पेरणी-रोपणी तसंच शेतीच्या इतर मशागतीची सर्व काम पूर्ण केली. मोडकळीस आलेल्या M80 या मोटरसायकलच्या निखळलेल्या प्रत्येक भागाचा वापर करून रमणनं हा अत्यंत सुरेख असा ट्रॅक्टर तयार केल आहे. हा ट्रॅक्टर पेट्रोलवर चालत असून एका लिटर पेट्रोलमध्ये एक ते दीड तास शेतीची मशागत होत असल्याच रमण खरपडे हा अवलिया सांगतो.
सध्या शेतीची काम पूर्ण झाली असून यात आणखीन आधुनिक करण्याचा मानस असल्याचंही रमणनं सांगितलं. या ट्रॅक्टरचा प्रत्येक भाग हा मोडकळीस आलेल्या M80 या मोटरसायकलचा बसवण्यात आला आहे. यामुळे रमणच्या पैशांची बचत होते, शिवाय शेतीची कामंही वेळेत पूर्ण होतात.
केवळ पाच ते सहा हजार रुपयांत ट्रॅक्टर तयार झाला असून अजूनही शेतीसाठी लागणाऱ्या इतर यंत्रांची निर्मिती करणार असल्याचं रमणकडून सांगण्यात येतंय. मात्र या सगळ्याला आर्थिक अडचणी येत असून शासन आणि सरकारनं पुढाकार घेऊन अशा तरुणांना नवचैतन्य देण्याची गरज आहे.