सातारा : भारतीय शेती क्षेत्रामधील प्रथम संशोधक, पद्मश्री पुरस्कार विजेते बनबिहारी विष्णू निंबकर (Banbihari Nimbkar) यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. त्यांचे पार्थिव फलटण येथील राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या पश्चात नंदिनी निंबकर, मंजिरी निंबकर व चंदा निंबकर या तीन मुली, पत्नी, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
बनबिहारी यांचा जन्म 17 जुलै 1931 रोजी गोवा येथे झाला. त्यांनी 1956 साली फलटणात शेती बियाणांमध्ये संशोधन करून 'निंबकर सिडस्' नावाने बाजारात आणले. 1968 रोजी निंबकर अॅग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटचीही (नारी) या संस्थेची त्यांनी स्थापना केली. बनबिहारी यांनी या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून शेती क्षेत्रात विशेष योगदान दिलं. त्यांचे शेती बियाणे व शेळी मेंढी पालन या व्यवसायामध्येही विशेष योगदान होते. त्यांनी बंगालमधील सुंदरबनातील शेळीमधील Booroola हा जनुक त्यांनी लोणंदच्या शेळीच्या जनुकामध्ये रुजवला. त्यातून नारी सुवर्णा नावाची शेळीची नवी जात निर्माण झाली. या शेळीची उंची अधिक असते, दख्खनी शेळीपेक्षा अधिक वेगाने तिची वाढ होते आणि तिला जुळं होण्याची शक्यता दुपटीने वाढते. साहजिकच पशुपालकाला या शेळीपासून भरपूर फायदा होतो.
आफ्रिकेतील बोअर शेळीपासून नवी संकरीत जातही या संस्थेने विकसित केली. बोअर शेळीची वाढही वेगाने होते आणि सेंद्रीय पदार्थांचं (पाला-पाचोळा, गवत, इत्यादी) रुपांतर प्रथिनांमध्ये (मांस) करण्याची कार्यक्षमताही वाढते. नारी सुवर्णा आणि संकरीत बोअर या दोन शेळ्यांची वाणं महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक या राज्यातील हजारो पशुपालकांना (यापैकी बहुतांशी धनगर), विशेषतः महिलांना पुरवण्यात आली. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात भरघोस वाढ झाली.
निंबकर एग्रीकल्चर रिसर्च इन्स्टीट्यूटने शेतीमध्ये मूलगामी संशोधन केलं आणि शेतकर्यांच्या उत्पन्नात वाढ केली. आधुनिक विज्ञान व समुचित तंत्रज्ञान याद्वारे ग्रामीण विकास हे या संस्थेचं उद्दिष्ट आहे. या कार्याबद्दल बी. व्ही. निंबकर आणि संस्थेला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. याच कार्यासाठी बी. व्ही. निंबकर यांना भारत सरकारने 2006 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलंय. तसेच 2016 रोजी जमनालाल बजाज अॅवॉर्ड पुरस्कारानेही गौरविण्यात आलं होतं.