सिंधुदुर्ग : कोकणातील सर्वात मोठा सण येत्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्‍सवासाठी सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात प्रवेश करताना कोविड लसीच्या दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना आरटीपीसीआर चाचणीची आवश्‍यकता नाही. मात्र ज्‍या नागरिकांनी कोविड लसीच्‍या दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्‍या नाहीत. त्‍यांनी जिल्‍ह्यात प्रवेशापूर्वी 72 तास पूर्वीचा आरटीपीसीआर चाचणीचा नकारात्मक अहवाल सोबत बाळगावा लागणार आहे. परंतु 18 वर्षाखालील मुलांचे लसीकरण होत नसल्‍याने त्‍यांच्या प्रवेशास आरटीपीआर चाचणी अहवाल आवश्यक राहणार नाही अशी माहिती जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली.

 

शासनाच्‍या https://epassmsdma.mahait.org/LoginHandler.htm या संकेतस्‍थळावरुन दोन मात्रा पूर्ण झालेल्‍या नागरिकांनी प्राप्त होणारा Universal Pass उपलब्ध करुन घ्‍यावा. जेणेकरुन प्रवासादरम्‍यान तपासणीकरिता लागणाऱ्या वेळेची बचत होईल. गणेशोत्सव 2021 साठी महाराष्‍ट्र शासन, गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्‍यात आल्‍या आहेत. या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन गणेशोत्सव 2021 चा सण साजरा करण्‍यात यावा असेही यात म्हटले आहे.