मुंबई : केंद्र सरकारकडून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 112 पद्म पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा 'पद्मविभूषण'ने गौरव होणार आहे. वयाच्या 97 व्या वर्षी बाबासाहेबांना दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला.


बाबासाहेब पुरंदरेंचा जन्म 29 जुलै 1922 रोजी झाला. बळवंत मोरेश्वर ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवड. इतिहासाचा ध्यास घेतलेले बाबासाहेब हे तरुणपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळून संपर्कात होते. त्या काळातच ते प्रल्हाद केशव अत्रे यांच्या वृत्तपत्रात लेखन करत. ज्येष्ठ इतिहासकार आणि कादंबरीकार गो. नी. दांडेकरांशी पुढे त्यांची भेट झाली. ते नेहमी गडांवर एकत्र भटकंती करत.

बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला. बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसेच नाट्यलेखन व जाणता राजा या नाटकाचे दिग्दर्शन केले.

पुरंदर्‍यांची दौलत, पुरंदर्‍यांची नौबत, गड-किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे साहित्य (गडसंच), शेलारखिंड, व राजा शिवछत्रपती हे बाबासाहेबांचे आजवर प्रकाशित झालेले साहित्य. शिवचरित्र हे घरोघरी पोहचावे हे ध्येय ठेवून बाबासाहेबांनी अथक संशोधनातून व परिश्रमांतून राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकार केला. या ग्रंथाच्या 16 आवृत्ती आजपर्यंत सुमारे पाच लाख घरांमध्ये पोहचल्या आहेत.

बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण हा राज्यातील सर्वोच्च पुरस्कार जाहीर केला, तेव्हा अनेक मराठा जातिधारक संस्थांनी विरोध केला होता. बाबासाहेब हे एक ललित लेखक असून इतिहास संशोधक नसल्याचा दावा केला जात होता.

बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेले ललित साहित्य

आग्रा
कलावंतिणीचा सज्जा
जाणता राजा
पन्हाळगड
पुरंदर
पुरंदरच्या बुरुजावरून
पुरंदर्‍यांचा सरकारवाडा
पुरंदर्‍यांची नौबत
प्रतापगड
फुलवंती
महाराज
मुजर्‍याचे मानकरी
राजगड
राजा शिवछत्रपती पूर्वार्ध आणि उत्तरार्ध
लालमहाल
शिलंगणाचं सोनं
शेलारखिंड
सावित्री
सिंहगड