मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सगळेच पक्ष लागले आहे. देशात राजकीय परिस्थिती कशी आहे, लोकांना कौल कुणाला आहे, याची चाचपणी सर्व राजकीय पक्षांकडून सुरु आहे. अशात एबीपी न्यूजने सी वोटरसोबत मिळून देशातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जनतेची मतं काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये राम मंदिर सर्वात महत्त्वाच मुद्दा आहे.


नरेंद्र मोदी सरकारवर सातत्यानं आरोप होत आहेत की, राम मंदिराच्या मुद्द्यावर मोदी सरकार गंभीर नाही. केवळ निवडणुकांमध्ये हिंदू वोट मिळवण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा भाजप हाती घेत आहे. राष्ट्रीय स्वयं सेवक संघ आणि भाजपने मोठ्या गाजावाजा करत राम मंदिराचा मुद्दा उचलला आणि त्याला राजकीय स्वरुप दिलं, असा आरोप भाजपवर केला जातो.


राम मंदिराबाबत जनतेला काय वाटतं हे एबीपी न्यूजने सी वोटरच्या माध्यमातून तपासून पाहिलं. त्यावेळी 49.3 टक्के लोकांना वाटतं की, केवळ निवडणुकांसाठी राम मंदिराच्या मुद्द्याचा वापर भाजपकडून होत आहे. तर 39.1 टक्के लोकांना वाटतं की, भाजप राम मंदिर बांधण्याबाबत गंभीर आहे. तर 11.6 लोकांनी म्हटलं की, या विषयावर आम्ही काय बोलू शकत नाही.


राम मंदिराचा मुद्दा सुप्रीम कोर्टात निकाली लागला नाही आणि मोदी सरकारने यावर अध्यादेशही आणला नाही, तर तुम्ही भाजपला वोट करणार का? असं ज्यावेळी लोकांना विचारलं त्यावेळी 50.4 टक्के लोकांनी भाजपला इतर मुद्द्यांवर मतदान करणार असल्याचं सांगितलं. तर 25 टक्के लोकांनी भाजपला कधीच मतदान करणार नाही असं सांगितलं. तर 15.6 टक्के लोकांनी भाजपने अध्यादेश काढला नाही तर भाजपला मतदान करणार नसल्याचं सांगितलं.


अयोध्या राम मंदिर प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषद यांसारख्या हिंदुत्ववादी संघटना लवकरात लवकर राम मंदिर बांधण्यासाठी भाजपवर दबाव टाकत आहेत. मात्र सरकार राम मंदिर प्रश्नाबाबत अध्यादेश आणणार नसल्याचं आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं आहे.


संबंधित बातम्या 


मूड देशाचा : भाजपला धोक्याची घंटा, सेनेला स्वबळाचा फटका बसण्याचा अंदाज