मुंबई : महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत पानी फाऊंडेशनकडून आज राज्यात ठिकठिकाणी महाश्रमदान करण्यात आलं. साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यात अभिनेता आमीर खाननेही जलमित्रांसह श्रमदानात भाग घेतला.


वाशिम जिल्ह्यातील पिंप्री गावात आज महाश्रमदानाचं आयोजन करण्यात आलं होतं. वाशिमचे जिल्हाधिकारी, जिल्हापरीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही थेट बांधावर जाऊन श्रमदानात सहभाग नोंदवला. अधिकारीही श्रमदानासाठी सहभागी झाल्याने गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने श्रमदान केलं.

सोलापूरमध्येही महाराष्ट्र दिनानिमित्त रानमसले गावात श्रमदानाचं आयोजन करण्यात आलं.  एप्रिल महिन्याच्या 8 तारखेपासून या गावात गावकऱ्यांचं श्रमदान सुरु आहे. आज महाराष्ट्र दिनानिमित्त पानी फाऊंडेशनच्या जलमित्र मोहीमेत सहभागी होत अंदाजे दीड हजार तरुणांनी रानमसलेत महाश्रमदानासाठी नोंदणी केली. सकाळी 6 वाजताच ग्रामस्थांनी श्रमदानासाठी हजेरी लावली. बाहेरुन आलेल्या जलमित्रांचे यावेळी औक्षण करून स्वागत देखील करण्यात आले. यावेळी हजारो नागरिकांनी या महाश्रमदानात सहभाग नोंदवला.

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातही पाणी फाऊंडेशनच्या वतीने आज महाश्रमदान राबवण्यात आलं.