Marathwada: गेल्या महिन्याभरापासून बांगलादेशमध्ये हिंसाचार उफाळलाय. गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या हिंसाचाराच्या घटनाही वाढल्या आहेत. दरम्यान 4 डिसेंबर रोजी जमावाने हिंदूंच्या शंभरहून अधिक घरांची तोडफोड केली. हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांचा आता भारतभर रोष दिसून येत आहे. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा विरोधात मराठवाड्यात कडकडीत बंद पाळला जात असल्याचे चित्र आहे.  बाजारपेठांमध्ये शुकशुकाट असून अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्यात येणार आहे. परभणीत  शाळा महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना सोडण्यात आलंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हिंदू जनजागरण समितीकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने आंदोलन करण्यात येत आहेत. यात रामगिरी महाराजही सहभागी झालेत. 


परभणीत शुकशुकाट, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा


बांगलादेश मध्ये होत असलेल्या हिंदूंवरील अत्याचाराचा विरोधात मराठवाड्यात रोज उफाळला आहे. आज सकाळपासून परभणी आणि परळीत बंद पुकारण्यात आलाय. बाजारपेठांमध्ये शुकशुकाट दिसत असून शाळा व महाविद्यालयातूनही विद्यार्थ्यांना सोडण्यात आलंय. सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर परभणीत मोर्चा काढण्यात येणार असून मोठ्या प्रमाणावर हिंदू बांधव या मोर्चात सहभागी होणार आहेत. 


परळीत बांगलादेश अत्याचाराचे पडसाद 


बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात बीडच्या परळीत आज परळी बंदची हाक दिली आहे. सकाळपासून व्यापाऱ्यांनी आपली आस्थापने बंद ठेवून बंदला पाठिंबा दिलाय. बांगलादेशात हिंदू धर्मीयांवर अत्याचार होत असून त्याचे पडसाद सर्व ठिकाणी पाहायला मिळतात. परळी शहर आज कडकडीत बंद पाळत असल्याचे चित्र आहे. राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात निषेध नोंदवण्यासाठी परळीकर उपस्थित राहणार आहेत. 


छत्रपती संभाजीनगरमध्ये रामगिरी महाराजही मोर्चात उतरले 


बांगलादेश हिंदू अत्याचार विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंदू जनजागरण समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात वादग्रस्त ठरलेले महंत रामगिरी महाराज उतरले असून रामगिरी महाराज यांनी आजच्या आंदोलनात कोणतेही प्रक्षबक वक्तव्य करू नये याची खबरदारी घेण्यात आली आहे.  आजच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा ताफा तैनात असणार आहे. शिवाय रामगिरी महाराजांना आंदोलनात कोणतेही वादग्रस्त वक्तव्य न करण्याची नोटीसही देण्यात आली आहे.