मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील सर्वच कारागृहातून जवळपास 17 हजार कैद्यांना तात्पुरतं सोडण्यात येणार आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत माहिती दिली आहे. मुंबईच्या ऑर्थर रोड कारागृहात जवळपास 185 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यातील इतर कारागृहातही हीच परिस्थिती निर्माण होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर कारागृहांमध्ये कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली.


राज्यभरातील जेलमध्ये सध्या जववळपास 35 हजार कैदी विविध गुन्ह्याखाली शिक्षा भोगत आहेत. त्यापैकी 17 हजार कैद्यांनी सोडण्यात येणार आहे. त्यामध्ये अंडरट्रायल असणाऱ्या कैद्यांना मधल्या काळात सोडण्यात आलं आहे. सात वर्षांपर्यंतची शिक्षा झालेल्या 3 हजार कैद्यांना सोडण्यात येणार आहे. तसेच सात वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झालेल्या जवळपास 9 हजार कैद्यांना सोडण्यात येणार आहे, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे.





मुंबईतील आर्थर रोड तुरुंगाला कोरोनाचा विळखा



मात्र बलात्कार, मोठे आर्थिक घोटाळे केलेले गुन्हेगार, मोक्का, टाडा यासारखे गंभीर गुन्ह्यांखाली शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना सोडलं जाणार नाही, अशी माहिती अनिल देशमुखांनी दिली. तसेच राज्यातील 8 कारागृहांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहेत. म्हणजे या कारागृहांमध्ये नवीन कैदी किंवा पोलीस येणार नाही आणि आत असलेले कैदी किंवा पोलीस बाहेरही जाणार नाहीत, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.