मुंबई : कोरोना काळातही संपूर्ण काळजी घेऊन महाराष्ट्राने उद्योग चालवून दाखविले असे उदाहरण मला देशात निर्माण करायचे आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आपल्याला लॉकडाऊन आणि नॉकडाऊन दोन्ही नकोत. त्यामुळे आरोग्याचे नियम पाळत रहा, असं त्यांनी आज म्हटलं. कोविड संदर्भात प्रमुख उद्योजकांसमवेत आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं उद्योजकांनी कौतुक केलं असून काही सूचना देखील दिल्या आहेत. उद्योजक हर्ष गोएंका यांनी ट्विट करुन मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे. महाराष्ट्राचं हे मॉडेल इतर राज्यांनीही अनुकरण करायला हवं, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.  काही दिवसांपूर्वीच उद्योजक आनंद महिंद्रा यांनी मुख्यमंत्र्यांचं ट्विटरवरुन कौतुक केलं होतं. मुख्यमंत्र्यांनी जून महिन्यात वाढविलेल्या लॉकडाऊनचं महिंद्रा यांनी समर्थन केलं होतं.  




उद्योजकांनी केल्या या सूचना 
निर्बंधांसंदर्भात निकष आणि लेव्हल्स (पातळ्या) चा निर्णय चांगला आहे. याबाबत लोकांमध्ये योग्य रीतीने जनजागृती होणे अपेक्षित आहे. 
विशेषत: ग्रामीण भागातील संसर्ग रोखण्यासाठी उद्योजक मदत करतील व योगदान देतील
उद्योग क्षेत्राशी संबंधित असंघटीत वर्गाचे लसीकरण व इतर काळजी घेणं आवश्यक
आयटी क्षेत्राने वर्क फ्रॉम होमवर पुढील काही महिना भर द्यावा
उद्योग व कारखान्यांत येणारे कर्मचारी यांचे लसीकरण, चाचणी याबाबत वर्गीकरण करावे
तिसऱ्या लाटेत आर्थिक व्यवहार बंद होऊ नयेत.
उद्योगांनी केवळ त्यांच्या कर्मचाऱ्यांचेच नाही तर त्यांच्या परीवारांचेही लसीकरण जलद गतीने करावे
लसीकरणाला जनतेचा प्रतिसाद वाढविण्यासाठी अगदी तळागाळात जाऊन लोकशिक्षण करावे
बांधकाम क्षेत्रात काम करणारे तसेच कामगार यांचे लसीकरण मोठ्या प्रमाणावर होणे गरजेचे आहे.
मुंबई खूप मोठे आहे त्यामुळे निर्बंधांच्या बाबतीत अगदी लहान लहान कंटेनमेंट झोन्सवर भर द्यावा.
पहिल्या पातळीमध्ये आपण लोकांना विविध कारणांसाठी , समारंभ, कार्यक्रमासाठी अधिक संख्येने उपस्थित राहण्यास  परवानगी दिली आहे, त्याबाबत अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
रस्त्यांवर पोलिसांचे चेक पोस्ट हटवावे म्हणजे वाहतूक संथ होणार नाही व गर्दी टळेल.. 


मुख्यमंत्री ठाकरे काय म्हणाले...
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, आपण कॅलक्युलेटेड रिस्क घेत आहोत अनलॉक करताना  त्यामुळे काळजी घ्या. एकदम काहीही शिथिल केलेले नाही. त्यासाठी काही निकष आणि पातळ्या ठरविल्या आहेत. स्थानिक पातळीवर जीक्ळ प्रशासन निर्बंध किती शिथिल करायचे किंवा कडक याबाबत निर्णय घेतील. साप भी मरे और लाठी भी ना तुटे असे आपल्याला वागावे लागेल. युकेतील विषाणू सारखे किंवा त्यापेक्षाही जास्त धोकादायक पद्धतीने आपल्याकडे संसर्ग वाढला. गेल्या वर्षभरात सुविधा वाढवल्या . साडे तीन लाख बेड्स वरून साडे चार लाख बेड्स पर्यंत पोहचलो. प्रयोगशाळा वाढविल्या आहेत. कोविड केअर केंद्रे वाढवली आहेत पण दुसऱ्या लाटेत आपल्याला काही सुविधा अपुऱ्या पडतील की काय अशी भिती होती. ऑक्सिजनचा तुटवडा झाला पण सर्व मोठ्या कंपन्यांनी आम्हाला ऑक्सिजन उपलब्धतेसाठी सहकार्य केले, असं ते म्हणाले. 


उद्योगांनी कामगारांसाठी तात्पुरत्या निवास सुविधा उभाराव्यात 


बांधकाम कामगार तसेच राज्यातील इतर उद्योगांमध्ये बाहेरील राज्यातील जे कामगार काम करीत आहेत त्यांची आरोग्य विषयक नोंद व्यवस्थित ठेवा. त्यांनी त्यांच्या  राज्यात जाताना आणि तिकडून येताना कोविडचा विषाणू पसरवू नये . त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची देखील माहिती ठेवा. कामगार परराज्यातून आल्यानंतर त्यांना विलगीकरणात ठेवावे, त्यांची तपासणी  करावी
पावसाची सुरुवात होते आहे. त्यामुळे रोगराई वाढू शकते, साथीचे रोग पसरतात. आपल्या कामगार आणि कर्मचारी यांना आरोग्याचे नियम पाळतील असे पहा. आरोग्य तपासण्या कराव्यात
बांधकामांच्या ठिकाणी पाणी साचून मलेरिया, देणगी यासारखे रोग पसरणार नाही हे पहा. येणाऱ्या काळात कोरोनाची तिसरी लाट आली आणि लॉकडाऊन करावा लागला तरी उद्योगांच्या दैनंदिन कामकाजावर , उत्पादनावर परिणाम झाला नाही पाहिजे. आपण जसे आरोग्यासाठी फिल्ड सुविधा उभारल्या  तसे उद्योगांनी त्यांच्या भागात कामगार व कर्मचारी यांच्यासाठी तात्पुरत्या निवास सुविधा उभाराव्यात तसेच वैद्यकीय व इतर आवश्यक सुविधा यांचे नियोजन करून ठेवावे, असंही ते म्हणाले. 


 या बैठकीस उद्योग मंत्री सुभाष देसाई, सीआयआयचे पदाधिकारी उदय कोटक, संजीव बजाज, बी थियागराजन, डॉ नौशाद फोर्बस, अमित कल्याणी, अशोक हिंदुजा, ए एन सुब्रमनियन, डॉ अनिश शहा, अजय पिरामल,बनमाली अग्रवाल, हर्ष गोयंका, सुनील माथुर, उज्वल माथुर, संजीव सिंग, बोमन इराणी, निरंजन हिरानंदानी, जेन करकेडा, असीम चरनिया, सुलज्जा फिरोदिया सहभागी. याशिवाय टास्क फोर्सचे अधुक्ष डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी अन्बलगन आदि उपस्थित होते.