Maharashtra Corona Update: देशात कोरोना महामारीनं (Corona in India) कहर केला आहे. त्यात सर्वाधिक प्रकोप झाला तो महाराष्ट्रात. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना (Maharashtra Corona Cases)रुग्णसंख्येसह सर्वात जास्त मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. राज्यात कोरोनामुळं गेलेल्या बळींची (Maharashtra Corona Death) संख्या लाखाच्या जवळ पोहोचली आहे. एक-दोन दिवसात हा आकडा महाराष्ट्र पार करेल अशी शक्यता आहे. आता जरी कोरोनाचे आकडे कमी येत असले तरी कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून राज्यात 99,512 लोकांचा जीव गेला आहे. दुर्देवाने आज किंवा उद्या महाराष्ट्रातल्या कोरोना मृत्यूचा आकडा 1 लाखावर पोहोचण्याची शक्यता आहे. देशात 3 लाख 46 हजार मृत्यू नोंदवले गेले आहेत. याचा अर्थ कोरोनामुळं दगावलेला प्रत्येक तिसरा व्यक्ती हा महाराष्ट्रातील आहे.  दुसऱ्या क्रमांकांवर कर्नाटक आहे. कर्नाटकापेक्षा महाराष्ट्रात 70 हजार अधिक मृत्यू झाले आहेत. 


जगातील केवळ सात देशांमध्ये एक लाखांहून अधिक मृत्यू 
कोरोनामुळं भारतासह जगातील केवळ सात देशांमध्ये एक लाखांहून अधिक मृत्यू झाले आहेत. सध्या कोरोनाची साखळी काही अंशी तोडण्यात यश मिळालं आहे. देशासह महाराष्ट्रात आकडे कमी येत आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील कोरोना मृत्यूंची संख्या फ्रांस देशाच्या मृत्यू संख्येच्या जवळ आहे. फ्रान्समध्ये 1.09 लाख लोकांचा मृत्यू झाला. या यागीत रशिया (1,23,436 मृत्यू), इटली (1,26,472 मृत्यू), यूके (1,27,836 मृत्यू), भारत (3,46,784  मृत्यू), ब्राझील (4,72,629 मृत्यू) आणि सर्वात जास्त मृत्यू हे अमेरिकेत (6,12,203  मृत्यू) झाले आहेत.


Coronavirus : तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी राज्य सरकारची सर्व तयारी पूर्ण; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा विश्वास


राज्यात काल 13 हजार 659 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
राज्यात काल शनिवारी 13 हजार 659 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर 21 हजार 776 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. 300 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात एकूण 1,88,027 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आजवर एकूण 55,28,834 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.01% टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यात 14,00,052 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 7,093 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी राज्य सरकारची सर्व तयारी पूर्ण
तिसऱ्या लाटेची 100 टक्के शक्यता केंद्र सरकारने व्यक्त केली आहे, मात्र याला तोंड देण्यासाठी राज्य सरकारची सर्व तयारी पूर्ण झाली आहे, लहान मुलांना कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता राज्य सरकार पूर्ण सज्ज असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.राज्यात सोमवारपासून होणाऱ्या अनलॉकवर प्रतिक्रिया देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला नियम पाळण्याचे आवाहन केलं आहे. बऱ्याच दिवसाने होणाऱ्या अनलॉकमुळे संभाव्य गर्दी लक्षात घेता नागरिकांनी कोरोनाविषयक नियम गांभीर्याने पाळावेत असं यावेळी ते म्हणाले.