700 वर्षांपासून अभिमानास्पद इतिहासाचा वैभवशाली वारसा आपल्या अंगाखांद्यावर घेऊन उभ्या असलेल्या नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्याला नवी झळाळी मिळाली आहे.
पहिला बदल प्रवेशद्वारापासून... प्रवेशद्वार सुशोभित आणि शाही झालं आहे. किल्ल्यातील तटबंदी... बुरुज आणि सर्व महालांचं नूतनीकरण, सुशोभिकरण केलं आहे.
बागबगिचे... 44 पाण्याचे कारंजे आणि अंतर्गत रस्ते स्वच्छ झाले आहेत. पुरातत्व विभागानं युनिटी मल्टीकॉन या सोलापूरच्या खासगी कंपनीला बीओटी तत्वावर 15 वर्षांसाठी किल्ला विकसित करण्यासाठी दिला. कंपनीनं साडेचार कोटी खर्चून किल्ल्यात अनेक बदल केले. पण पुरातन वास्तूच्या बांधकामात हस्तक्षेप मात्र केलेला नाही.
सुमारे 1351 ते 1480 या बहमनी काळात बांधलेल्या या नळदुर्गच्या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व सर्वज्ञात आहे. राणीचा किल्ला... उतुंग टेहाळणी बुरुज... मशीद... बारदारी... या वास्तू सुरेख आहेत.
किल्ल्याभोवतीच्या बोरी नदीवर बंधारा टाकून पाणीमहालाचं बांधकाम करण्यात आलं आहे. अत्यंत कोरीव दगडी बांधकाम आणि महालाच्या दोन्ही बाजूंनी कृत्रिम पद्धतीनं सोडण्यात आलेले दोन सांडवे. या दोन्ही सांडव्यातून पावसाळ्यात 65 ते 70 फूट उंचीवरुन पाणी खाली कोसळतं. याला नर-मादी धबधबा म्हणतात. पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा हा धबधबा आता वर्षभर वाहता राहण्याची व्यवस्था सुरु केली आहे.
लवकरच किल्ल्याभोवती रात्री पर्यटकांना राहता येईल. किल्ल्यात 2 वर्षात स्वच्छतेची कामं मोठ्या प्रमाणात झाली आहेत. सर्वाधिक प्रेक्षणीय पाणी महालात प्रकाश व्यवस्था आहे. दहा तोफा एकत्रित करुन व्यवस्थित लावण्यात आल्या आहेत. तोफांभोवती छोट्या बागा तयार झाल्या आहेत. पर्यटकांसाठी पाणी आहे, स्वच्छतागृहही आहे.
हायवेशेजारी असलेल्या या किल्ल्याकडे आतापर्यंत कधीच नजर जायची नाही. पण आता हा किल्ला पुन्हा गजबजू लागला आहे. महाराष्ट्रातल्या 370 किल्ल्यांचा असाच कायापालट होऊ शकतो, गरज आहे त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची.