सोलापूर: शेतीत राम नाही असं सांगत गावाकडून शहरात नोकरीसाठी आलेली पोरं 10 हजार , 15 हजार जास्तीत-जास्त लाखभर रुपये महिना कमवत असतील. मात्र सोलापुरातल्या दुष्काळी भागातला एक शेतकऱ्यानं शेतीच्या जोरावर तब्बल साडेसहा लाख रुपये महिना कमावतो.


सोलापुरातल्या नालबंदवाडीच्या नामदेव थिटे यांनी एक चमत्कारच केला आहे. 6 महिन्याची मेहनत, 4 एकराची मिर्ची आणि उत्पन्न 40 लाखांचं. म्हणजे वर्षाला 80 लाख. एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीत काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या पगारापेक्षा जास्त.



सप्टेंबर महिन्यात नामदेवरावांनी ढोबळी मिरची लावली. जानेवारीत घरच्या शेडनेटवरचं कापड मिरचीवर बांधलं. तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानं मिरची चांगली पोसली. अवघ्या महिनाभरात मिरची तोडणीस आली. बाजारात दर मिळाला 15 ते 35 रुपये किलो. आतापर्यंत 200 टन माल विकला गेला आहे.

खरं तर हे गाव बिनपाण्याचं. पण नामदेवरावांनी त्यावरही रामबाण उपाय शोधला. त्यांनी पाण्याची चिंता मिटावी यासाठी शेततळी तयार केली. त्यामुळे आता त्यांना पाण्याची चिंता भेडसावत नाही. त्यामुळे आता पंचक्रोशीतले शेतकरीही नामदेवरावांच्या या शेतीला भेट देत आहेत.

शेतीत पैसा नाही, असं म्हणून शहराकडे वळणाऱ्या पोरांच्या हाती महिन्याकाठी पाच आकडी पगार पडत असेल. पण गावात राहून, परिस्थितीशी झुंजत नामदेवरावांनी 6 आकड्यांना गवसणी घातली.