उस्मानाबाद : उस्मानाबाद इथं होणाऱ्या 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ ग्रंथ दिंडीने झाला आहे. मसापचे अध्यक्ष कौतिकराव ढाले पाटील ,मावळत्या अध्यक्षा अरुणा ढेरे आणि विक्रम काळे यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीचे पूजन करण्यात आले आहे. ग्रंथ दिंडीला साहित्य प्रेमींसह लहान मुलं मुली आकर्षक वेशभूषा करून सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी लेझीम आणि संगीताच्या तालावर ठेका धरला.


उस्मानाबाद येथील संत गोरोबा काका साहित्यनगरी येथे 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रंगणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर उस्मानाबाद राज्यासह देशभरातून येणाऱ्या मराठी साहित्यप्रेमीच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. साहित्य संमेलन परिसरातील भिंतीवरती वेगवेगळे चित्र रेखाटण्यात आले आहेत. सामाजिक आशयाच्या चित्रांसह संत गोरोबा काकांचा जीवनप्रवास देखील या चित्रांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. उस्मानाबाद मधील स्थानिक कलावंतांनी हे चित्र रेखाटली आहेत. फ्रान्सिस दिब्रिटो हे संमेलनाध्यक्ष असल्यानं पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर ख्रिस्ती बांधव देखील संमेलनाला हजेरी लावणार आहेत.

Sahitya Sammelan | ग्रंथ दिंडीने साहित्य संमेलनाचा शुभारंभ | ABP Majha


साहित्यसंमेलनाची प्रत्येक घडामोड ई-बुक स्वरूपात


साहित्य संमेलन कायमस्वरूपी आठवणीत राहावे यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. यंदाच्या साहित्य संमेलनात तंत्रज्ञानाची जोड देखील देण्यात आली आहे.  आता पर्यंत झालेल्या साहित्य संमेलनाचे दस्तऐवज सामान्य लोकांना सहज मिळवणं कठीण आहे. हीच गोष्ट लक्षात घेत पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी साहित्य संमेलनातील प्रत्येक घडामोड ई-बुक स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. गुगल बुक, इकोबुकहट या प्लॅटफॉर्मवर हे ई-बुक निशुल्क मिळणार आहे. विशेष म्हणजे या ई-बुकवर कोणत्याही निर्मात्याचे नाव नसणार आहे. साहित्य जिवंत राहावे आणि सर्वांना सहज उपलब्ध व्हावे या हेतूने या ई-बुकची निर्मिती करण्यात आली आहे.

पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेने दिब्रिटो यांचं नाव अध्यक्षपदासाठी सुचवलं होतं. त्यानंतर 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली होती. मात्र त्यांच्या निवडीला अनेकांनी विरोध केला होता. दिब्रिटो यांचं साहित्य ख्रिस्ती धर्मावर आधारित असल्यामुळे मराठी साहित्यामध्ये दिब्रिटो यांचे कामच नाही, असा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे. त्यामुळे अध्यक्षपदी त्यांची निवड करू नये अशी मागणी अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. त्यामुळे संमेलनस्थळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

नामांकित कंपन्यांच्या दुधात भेसळ करणारी टोळी अटकेत, 139 लिटर दूध जप्त

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी मुख्य आरोपीला बेड्या

...तर जस्टिस लोया प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन करु : अनिल देशमुख