मुंबई : मुंबईत नामांकित कंपन्यांच्या दुधामध्ये भेसळ करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलीस गुन्हे शाखा युनिट नंबर 12च्या दोन पथकांनी ही कामगिरी यशस्वी पार पाडली. आरोपींकडून एकूण 139 लिटर भेसळयुक्त दूध आणि भेसळीसाठी वापरलं जाणारं इतर साहित्या ताब्यात घेण्यात आलं आहे.


मुंबईत गोरेगाव पोलीस ठाणे आणि बांगुरनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही जण नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या पिशवीत दूषित पाणी मिसळून ते ग्राहकांना वितरत करतात, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर गुन्हे शाखा १२ ने दोन पथकं तयार केली. या पथकांमध्ये अन्न व औषध प्रशासनाचे  अधिकाऱ्यांचा समावेश होता. यानंतर पथकाने गोरेगाव पश्चिममधील भगतसिंग नगर, लिंक रोड इथे छापा टाकला. या ठिकाणावरुन एका पुरुष आणि एका महिलेला ताब्यात घेण्यात आलं. तर दुसऱ्या पथकाने हनुमाननगर गोरेगाव पश्चिममध्ये छापा टाकून दोघांना ताब्यात घेतलं.

दोन्ही पथकांनी ताब्यात घेतलेले तीन पुरुष आणि एक महिला हे नामांकित अमूल गोल्ड आणि अमूल ताजा या दूध कंपन्यांच्या मूळ पिशव्या कात्रीने कापून, त्यामधील दूध काही प्रमाणात बाहेर काढून, त्यात दूषित पाणी मिसळायचे. त्या दुधाच्या पिशव्या स्टोव्ह पिन आणि मेणबत्तीच्या सहाय्याने पुन्हा सील करुन नामांकित कंपन्यांचे प्रमाणित दूध आहे असं भासवत. बेकायदेशीर लाभ मिळवण्याच्या इराद्याने ग्राहकांना या दुधाची विक्री करण्याच्या तयारीत होते.

मात्र त्याच वेळी गुन्हे शाखा नंबर 12 च्या  दोन्ही टीमने आरोपींना पकडून त्यांच्याकडून एकूण 139 लिटर भेसळयुक्त दूध ताब्यात घेतलं. तसंच इथून दूध भेसळ करण्यासाठी लागणारे साहित्य, अमूल कंपन्यांच्या बनावट पिशव्या, प्लास्टिकच्या पिशव्या जप्त करुन या चौघांना अटक केली. पुढील तपास गुन्हे शाखा करत आहे.