नागपूर : नागपूरच्या गिट्टीखदान पोलिस स्टेशनमधील कर्मचाऱ्याच्या बर्थडे सेलिब्रेशननंतर पोलिस उपायुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तसंच काल रात्री उशिरा पोलिस स्टेशनला भेटही दिली आहे. शनिवारी एबीपी माझावर ध्वनी प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवत मध्यरात्री पोलिसांनी केलेल्या बर्थडे सेलिब्रेशनची बातमी दाखवण्यात आली होती.


21 नोव्हेंबरला मध्यरात्री पोलिसांनी आपल्याच कर्मचाऱ्याचं ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडून जंगी सेलिब्रेशन केलं होतं. त्यानंतर माझाच्या बातमीची दखल घेत पोलिस उपायुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. एसीपींच्या माध्यमातून ही चौकशी केली जाणार आहे. तसंच या चौकशीचा अहवाल सोमवारपर्यंत सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

ध्वनी प्रदूषणाचे सर्व नियम धाब्यावर बसवत पोलिसांनी 21 नोव्हेंबरला मध्यरात्री एका पोलिस अधिकाऱ्याचा वाढदिवस साजरा केला. महत्त्वाची बाब म्हणजे लॉटरी व्यावसायिकाच्या अपहरण आणि हत्या झाल्यादिवशीच मध्यरात्री ढोल ताशांच्या गजरात हा वाढदिवस साजरा करण्यात आला होता.