उस्मानाबाद : अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना धमक्यांचे फोन येऊ लागले आहे. उस्मानाबाद 93 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ख्रिस्ती धर्मगुरु फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड का केली? असे प्रश्न धमकी देणारे विचारत आहेत.


साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, महामंडळाचे कार्यवाह मिलिंद जोशी यांना धमक्यांचे फोन येत आहे. तुमचा दुर्योधन करू, तुम्हाला पाहून घेऊ अशा आशयाचे फोन साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना येत आहेत. याबाबत अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही.

कौतिकराव ठाले पाटील यांना जवळपास 20 ते 25 फोन आले आहेत. फोन करणाऱ्यांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र साहित्य महामंडळात एकमताने फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची समेलनाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सर्वच स्तरातून दिब्रिटो यांच्या निवडीचं स्वागत होत आहे. मात्र फोन करणाऱ्यांनाही त्यांचे मत मांडलं आहे, असं कौतिकराव ठाले-पाटील यांनी सांगितले.



फादर फ्रान्सिस दिब्रिटो कोण आहेत?


कृतिशील विचारवंत आणि सुधारणावादी लेखक ही फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची महाराष्ट्राला ओळख आहे. फ्रान्सिस दिब्रिटो 1983 ते 2007 या कालावधीत कालखंडात 'सुवार्ता' या प्रामुख्याने मराठी कॅथॉलिक समाजाशी संबंधित असलेल्या वार्तापत्राचे मुख्य संपादक होते.


'सुवार्ता' या मासिकाद्वारे त्यांनी सामाजिक प्रबोधनाचे अनेक वेगवेगळे विषय मांडले आणि काही उपक्रमही राबवले. त्यामुळे हे मासिक केवळ ख्रिस्ती धर्मियांसाठी न राहता मराठी साहित्यातही या मासिकाचा स्वतंत्र ठसा उमटला.


फ्रान्सिस दिब्रिटो हे पुणे येथे झालेल्या 15 व्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. 'सुबोध बायबल- नवा करार' या पुस्तकासाठी त्यांना साहित्य अकादमीचा 2013 सालचा राष्ट्रीय अनुवाद पुरस्कार मिळाला आहे.