मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. पटोले यांना येत्या तीन वर्षात मुख्यमंत्री होण्याची संधी आहे. एवढंच नाही तर येत्या तीन वर्षात अजित पवारांनीही मुख्यमंत्री व्हावं, त्यासाठी त्यांना शुभेच्छा आहेत, असं म्हणत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना टोला लगावला आहे. एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत रावसाहेब दानवे बोलत होते.


महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर आता मुख्यमंत्रीपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्मूल्याची चर्चा सुरू झाली. यावर बोलताना रावसाहेब दानवे यांनी नाना पटोले आणि अजित पवार यांना चिमटा काढला. नाना पटोले यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायचं आहे. अनेक वेळा त्यांनी हे माझ्याकडे बोलून दाखवलं आहे. त्यांना त्यासाठी शुभेच्छा आहेत. मात्र त्यासाठी त्यांच्याकडे फक्त तीन वर्षाचा काळ आहे. या तीन वर्षात त्यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावं. त्यानंतर त्यांना संधी मिळणार नाही. कारण 2024 नंतर भाजपची स्वबळावर सत्ता येईल. असा दावा रावसाहेब दानवे यांनी केलाय.
 
राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही राजकीय कारकीर्द मोठी आहे. ते राष्ट्रवादीचे गटनेते आहेत. त्यांनीही मुख्यमंत्री झालं पाहिजे. गावात ग्रामपंचायतीमध्ये लोक एक एक वर्ष किंवा दोन दोन वर्ष सरपंचपद वाटून घेतात त्याप्रमाणे महाविकास आघाडीतील पक्षांनी मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावं, असा सल्ला दानवे यांनी दिलाय.


शिवसेना आणि भाजपची जवळीक वाढणार का?


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वैयक्तिक भेट झाली या भेटीवर रावसाहेब दानवे यांना विचारले असता राजकारणात भेटीगाठी होत असतात. पण 2024 आली भाजप स्वबळावर निवडणूक लढले, पण त्यावेळी कोणी सोबत येणार असेल तर ते त्यावेळी ठरवलं जाईल. राजकारणात कोण, केव्हा आणि कधी जवळ येईल हे सांगता येत नाही, असं सांगायलाही ते विसरले नाहीत. 2019 साली जनतेचा दबाव असल्यामुळे आम्ही शिवसेनेसोबत एकत्र लढलो परंतु आता शिवसेनेने धोका दिला आहे, असं दानवे यांनी सांगितलं.


देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांची भेट राजकीय नव्हती


शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट राजकीय नव्हती तर शरद पवार आजारी असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. त्याचा कुठलाही राजकीय अर्थ निघत नाही, असंही दानवे यांनी म्हटलं.


संजय राऊत यांचा बोलविता धनी वेगळाच


गेल्या काही दिवसापासून संजय राऊत सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत आहेत. परंतु त्यांचा बोलविता धनी वेगळाच आहे, असं म्हणत दानवेंनी संजय राऊतांवर निशाना साधला. संजय राऊत यांना चावी दिली की ते बोलतात पण आता लोक संजय राऊतांना गांभीर्याने घेत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.