मुंबई : महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच के पाटील तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या तीन दिवसांच्या दौऱ्यात एच के पाटील महाराष्ट्र काँग्रेस आणि मुंबई काँग्रेसचा आढावा घेणार आहेत. नुकताच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. एकीकडे शरद पवार यांनी राष्ट्रवादी वर्धापन दिनानिमित्त महाविकास आघाडी सरकार लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढवणार असं स्पष्ट केलं. त्यानंतर नाना पटोले यांनी विदर्भात दौऱ्यावर काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे विधान केले. त्यामुळे चर्चाना सुरुवात झाली.
महाविकास आघाडी निवडणुका एकत्र लढवणार की स्वबळावर याबाबत पक्षश्रेष्ठी शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे निर्णय घेतील असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं. असं असलं तरी नाना पटोले यांनी मात्र मुंबईत देखील स्वबळाचा पुनरुच्चार केला. नाना पटोले यांनी हायकमांडने मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिल्यास स्वीकारेन असे विधान करूनही मुख्यमंत्री पदावर दावा केला आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच के पाटील राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. नाना पटोले यांनी दिलेला स्वबळाचा नारा काँग्रेस प्रभारी यांना मान्य आहे का? काँग्रेसने पुढील विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढवण्याची मानसिकता केली आहे का? असे प्रश्न या निमित्ताने चर्चा सुरू झाली. तसेच नाना पटोले हे काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार का? हा देखील प्रश्न आहे.
प्रभारी एच के पाटील तीन दिवसातील दौऱ्यात राज्यातील काँग्रेस मंत्र्यांची बैठक घेणार आहेत. काँग्रेसच्या मंत्र्यांची कामगिरी, किमान समान कार्यक्रमातील काँग्रेसच्या पूर्ण झालेल्या मागण्या याबाबत चर्चा होऊ शकते. पदोन्नतीतील आरक्षण विषयावरून ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी नाराजी दर्शवली होती. या दौऱ्यात प्रभारी एच के पाटील महाराष्ट्र काँग्रेस आणि मुंबई काँग्रेसचा आढावा देखील घेणार आहे.
राज्यात वाढत्या इंधन दराबाबत नुकताच महाराष्ट्र काँग्रेस आणि मुंबई काँग्रेसने वेगवेगळे आंदोलन केली होती. त्यांच्यातील समन्वयाचा अभाव दिसून आला होता, याबाबत चर्चा होणार का? याकडे ही लक्ष असणार आहे.
याबरोबर राज्यातील सुशील कुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण या प्रमुख ज्येष्ठ नेत्यांबरोबर प्रभारी एच के पाटील चर्चा करणार आहेत. त्यामुळे एकूणच एच के पाटील यांच्या दौऱ्याकडे लक्ष लागलं आहे. गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार दिन दिवस महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी मुंबईत बैठका घेणार आहेत.