बीड : राजकारणामध्ये खुर्ची मिळवण्यासाठी सगळ्यांचाच खटाटोप सुरू असतो. अशाच खुर्चीभोवती बीडच्या अंबाजोगाईमध्ये सध्या राजकारण तापल आहे. सत्ताधाऱ्यांनी पाच हजार रुपयांची खुर्ची थेट वीस हजार रुपयाला घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला आणि खुर्चीच्या खरेदीवरून राजकारण सुरू झालं आहे.
आद्य कवी मुकुंदराज सभागृह हे अंबाजोगाई शहरातील सांस्कृतिक चळवळीचा एकमेव केंद्र आहे. मराठवाड्यामध्ये ज्या व्यासपीठावरून सांस्कृतिक कार्यक्रमासाठी व्यासपीठ मिळालं ते हे सभागृह आहे. आता मात्र हेच सभागृह पालिकेने खरेदी केलेल्या खुर्च्यामुळे चर्चेत आले आहे.
राजकारणामध्ये खुर्चीला किती किंमत असते हे नव्याने सांगायची गरज नाही मात्र या खुर्च्यामुळे अंबाजोगाईत राजकारणात तापलं आहे. त्याचं कारण आहे या सगळ्या खुर्च्यांची खरेदी प्रत्येकी 19 हजार 900 रुपयाला करण्यात आली होती. त्यानंतर सारंग पुजारी यांनी जो आरोप केला आहे, त्याच्यामध्ये ही खुर्ची बाजारामध्ये चार ते पाच हजार रुपयाला मिळते. त्या संदर्भामध्ये आम्ही उपनगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्याशी संपर्क केला त्यांचे म्हणणे आहे की या खुर्च्यांची किंमत पंधरा हजारांच्या पुढे आहे.
अंबाजोगाई नगरपालिकेमध्ये सत्ता काँग्रेसची आहे आणि विरोधात भाजप आहे. नगरसेवक सारंग पुजारी यांनी या खुर्च्यातील खरेदीत झालेल्या घोटाळ्यासंदर्भात बीडच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे
खुर्च्या खरेदीचा मुद्दा हा जरी तुलनेने लहान असला तरी भाजपच्या नगरसेवकांनी काँग्रेसला संपूर्णपणे घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ही खरेदीच भाजपच्या माजी आमदारांच्या काळात केल्याचे सांगत आता निवडणुका जवळ आल्याने हे राजकारण केले जात आहे असं काँग्रेसचे म्हणणे आहे.
अंबाजोगाई नगरपालिकेची निवडणूक आता एका वर्षावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे स्वाभाविक आहे की, आता राजकारण तर नक्कीच होणार आहे. भविष्यातील खुर्ची मिळवण्याच्या नादात खुर्चीच्याभोवती चाललेली ही चर्चा मात्र मोठी रंजक होणार हे मात्र नक्की आहे.
संबंधित बातम्या :