Maharashtra Assembly Winter Session : महाराष्ट्राचे एकच म्हणणे... द्या हाकलून हे बुजगावणे... राज्यपाल झाले भाज्यपाल, राज्यपाल हटवा, महाराष्ट्र वाचवा, चोर है चोर है राज्यपाल चोर है... च्या घोषणा देत महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) आमदारांनी आज (30 डिसेंबर) अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विविध घोषणा देऊन विधानभवन (Vidhan Bhavan Nagpur) परिसर दणाणून सोडला. 


आंदोलकांनी हातात संघाच्या काळ्या टोप्या फिरवत महाराष्ट्राचे बुजगावणे त्वरीत हाकला, अशी जोरदार मागणी केली. तसेच शेतकरी जसे शेतात बुजगावणे उभारतात तसेच विधानभवनाच्या पायऱ्यांवर बुजगावणे मांडून विरोधकांनी जोरदार आंदोलन करत सत्ताधाऱ्यांना (Eknath Shinde - Devendra Fadnavis Government) घेरण्याचा प्रयत्न केला.


बुजगावणे हे शेतमालाच्या संरक्षणाकरता शेतात उभारले जातात. पाखरांनी शेतमाल खाऊ नये असा त्यामागचा उद्देश असतो. राज्यात देखील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या रुपात दोन बुजगावणे आहेत. यांच्यासमोर गायरान खाल्ली जात आहे, भूखंड चोरले जात आहेत, महापुरुषांचा अपमान केला जात असून हे बुजगावणेरुपी सरकार गप्प बसलंय, अशी खरमरीत टीका यावेळी विरोधकांनी केली.


आंदोलक आमदारांच्या घोषणाबाजीतून राज्यपालांबाबत आमदारांमध्ये किती असंतोष आहे हे दिसून येते. आंदोलन संपल्यानंतर त्या बुजगावण्याला लाथ मारुन ते खाली पाडण्यात आले. या आंदोलनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार रोहित पवार, वैभव नाईक, विकास ठाकरे, वर्षा गायकवाड यांच्यासह सर्व आमदारांचा सहभाग होता.


कालही एकतर्फी घोषणा...


विधिमंडळ अधिवेशनात गुरुवारीही (29 डिसंबर) विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक सूर आळवला होता. "हकालपट्टी करा, हकालपट्टी करा.. भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी करा", 'शेतकऱ्यांना धोका, मंत्र्यांना खोका', 'विदर्भाला धोका, मंत्र्यांना खोका', 'महाराष्ट्राला धोका... मंत्र्यांना खोका', 'शेतकरी हैराण, सरकार खातो गायरान', 'सीमावासी हैराण.. सरकार खातो गायरान' या घोषणांनी विरोधकांनी विधानभवन परिसर दणाणून सोडला होता. 


सत्ताधाऱ्यांमध्ये शुकशुकाट


नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून महाविकास आघाडीचे आमदार पायऱ्यांवर येताच सत्ताधारी आमदारही आपल्या पक्ष कार्यालयातून महाविकास आघाडी विरोधात घोषणा देत माध्यमांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही सत्ताधारी आमदार शांत असल्याचे दिसून येत आहे.


ही बातमी देखील वाचा...


Winter Assembly Session : त्या कटआऊटचा फोटो व्हायरल झाला अन् मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची 'उंची' समान झाली!