बीड : स्त्री भ्रूण हत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर सुदाम मुंडे याने जामिनावर बाहेर आल्यानंतरही बेकायदेशीरपणे दवाखाना सुरू ठेवला. परळीजवळ सुदाम मुंडेचा हा दवाखाना सुरू होता. ही माहिती मिळताच बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशाने आरोग्य विभागाने या बेकायदेशीर दवाखान्यावर छापा टाकला. जवळपास 6 ते 7 सात आरोग्य विभागाचं हे ऑपरेशन सुरु होतं अशी माहिती आहे.


सध्या माहिती अशी आहे की, सुदाम मुंडे पोलिसांच्या ताब्यात आहे. परळी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्याचे काम सुरू आहे. सुदाम मुंडे कोरोना सदृश्य रुग्णावर बेकायदेशीर उपचार करत होता. विशेष म्हणचे चार ते पाच रुग्ण त्याच्या बेकायदेशीर रुग्णालयात उपचार घेत होते. गर्भपाताला लागणारे साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  डॉ.सुदाम मुंडे वर वेगवेगळ्या 13 कलमांखाली पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला असून गर्भपात कायद्या अंतर्गत दुसऱ्यांदा गुन्हा दाखल केला आहे. तसेच साथरोग नियंत्रण कायदा, शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी देखील गुन्हा दाखल केला आहे.

परळीतील उच्चशिक्षित असलेले सुदाम मुंडे आणि सरस्वती मुंडे हे डॉक्‍टर दांपत्य आर्थिकदृष्ट्याही सक्षम होते. पत्नी डॉ. सरस्वती स्त्रीरोग तज्ज्ञ, डॉ. सुदाम स्त्रीरोग आणि अस्थिरोग शल्यचिकित्सक असा दुहेरी पदवीधारक होता. परळीतील मोजक्‍या स्त्रीरोग तज्ज्ञांपैकी असल्याने या दाम्पत्याचा वैद्यकीय व्यवसायही जोरात होता. त्यातच बसस्थानकासमोर असल्याने त्याचे रुग्णालय गजबजलेले असायचे. यातून मिळणाऱ्या पैशांवर समाधानी नसलेल्या या दाम्पत्याने पेशाला काळीमा फासायला सुरवात केली आणि बेकायदा गर्भलिंगनिदान, गर्भपात सुरू केले.


परळीतील मोजक्‍या आर्थिक सक्षम व्यक्तींपैकी एक असल्याने त्याची राजकीय उठबसही होतीच. याचाच गैरफायदा घेत त्याने महसूल, पोलिस, आरोग्य यंत्रणा आपल्या खिशात असल्याचा अविर्भाव आणला आणि आपल्या या कृत्याचा फैलाव वाढविला होता. डॉ. सुदाम मुंडे हा राजरोस बेकायदा गर्भलिंगनिदान, गर्भपात करायचा. मात्र, त्याने निर्माण केलेल्या दबावामुळे यंत्रणा डोळेझाक करायची.


डॉ. सरस्वती व डॉ. सुदाम मुंडे हे स्त्रीरोग तज्ज्ञ असले, तरी इथे स्त्री रुग्णांवरील उपचार कधी झालेच नाहीत. गर्भलिंगनिदान, गर्भपात यासाठीच हे रुग्णालय कुप्रसिद्ध होते. आरोग्य विभागाने केवळ 10 खाटांची परवानगी दिली असताना या रुग्णालयात 64 खोल्यातून तब्बल 117 खाटा होत्या. राज्यातील विविध भागांसह शेजारच्या गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून लोक येथे येत असत. त्यामुळे अक्षरशः या रुग्णालयात नेहमीच जत्रा भरलेली असायची.


सामाजिक, राजकीय कार्यक्रमांना पुढच्या खुर्चीवर बसणारा सुदाम मुंडे इकडे रुग्णालयात राजरोस बेकायदा गर्भातील कळ्या खुडायचा. गर्भपातासाठी लागणाऱ्या विक्रीडिल या औषधाच्या व्हाईल्सची जेवढी जिल्ह्यात मागणी आणि विक्री असे, त्यातली 70 टक्के मागणी आणि उपयोग एकट्या डॉ. सुदाम मुंडेच्या रुग्णालयात व्हायचा. 2010 ते 2012 या कालावधीत त्याच्या रुग्णालयात तब्बल तीन हजार 940 एवढ्या गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या विक्रीडिल या औषधींचा वापर झाला. सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याच्यावर थेट आरोप करूनही कुठल्याही यंत्रणेने दखल घेतली नव्हती.


मात्र, सुदाम मुंडेने 18 मे 2012 रोजी विजयमाला पटेकर (रा. भोपा, ता. धारूर) या ऊसतोड मजूर महिलेचा बेकायदा गर्भपात केला. यातच तिचा मृत्यू झाला आणि डॉ. मुंडेच्या पापाचा घडा भरला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. यात पीसीपीएनडीटी आणि एमटीबी कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद झाली. या सोबतच एमटीपी कायद्यानुसार सेक्शन 4 आणि 6 चा गुन्हा या दाम्पत्यावर दाखल झाला होता. एकूण 17 आरोपी या प्रकरणामध्ये होते. त्यातल्या जळगावच्या डॉ. राहुल कोल्हे यांचे अपघाती निधन झाले होते. इतर दोघांचाही दरम्यानच्या काळात मृत्यू झाला होता. या प्रकरणी उर्वरित 11 जणांना न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या पतीसह डॉक्टर दाम्पत्याला न्यायालयाने 10 वर्षांची शिक्षा सुनावली होती. सहा महिन्यापूर्वी त्याला सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळाला होता.