वर्धा : अंगात कलागुण असले की यशाला कुणी थांबवू शकत नाही. नियमित सराव, प्रबळ इच्छाशक्ती यशात सातत्य ठेवते. नियमित सराव करत गावातील रोजमजुरी करणाऱ्या कुटुंबातील लहानग्या योगपटूनं आंतरराष्ट्रीय ऑनलाईन योग स्पर्धेत सहावी रँक मिळवली आणि गावात वेगळंच आनंदाचं वातावरण निर्माण झालं.
वर्ध्याच्या पुलई या छोट्याशा गावात राहणारा सुजल विनायक कोहळे हा गावातीलच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा इयत्ता सातविचा विद्यार्थी आहे. तीन वर्षांपूर्वी गावात योगाचे क्लासेस घेतल्या गेले. त्यामध्ये सुजलनं सहभाग घेतला. आवड निर्माण झाल्यान सातत्याने योगाचा अभ्यास सुरू ठेवला. या तीन वर्षांच्या कालावधीत सुजलन विविध स्पर्धांत यशही मिळवलं. यावेळचं यश त्याच्या पंखांना बळ देणार आहे.
तुर्की इथल्या आंतरराष्ट्रीय योगा ऑलिम्पिक संघटनेच्यावतीनं ऑनलाईन पद्धतीन आंतरराष्ट्रीय योगा ऑलिम्पिक स्पर्धा घेतल्या गेली. त्या स्पर्धेकरिता सुजलचा योगासनांचा व्हिडीओ अपलोड केला. नुकताच या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये सुजलला सहावी रँक मिळाली. ही स्पर्धा वेगवेगळ्या वयोगटात घेतल्या गेली. या स्पर्धेत 60 देशांतील 1350 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यात खेड्यात राहणाऱ्या सुजलन मिळवलेलं यश वाखाणण्याजोग आहे. यापेक्षाही अधिक चांगली योगासन करत भविष्यात योग शिक्षक होण्याचं स्वप्न असल्याचं सुजलन सांगितलं.
सुजलचे आई-वडील रोजमजुरी करून कुटुंब चालवतात. त्यामुळे कौटुंबिक परिस्थिती अतिशय साधारण आहे. टिनपत्रांचं छत असलेल्या घरात राहणारा सुजल नियमीत योगा करतो. अनेकदा तो आईवडिलांनाही योगा करायला सांगतो. मुलानं अधिक यशस्वी व्हावं, नाव उज्ज्वल करावं, अशी अपेक्षा सुजलचे वडील विनायक कोहळे यांनी व्यक्त केली.
ऑनलाईनमुळे अनेकांना नवं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे. सामान्य कुटुंबातील चिमुकल्यानंही ऑनलाईन स्पर्धेत सहभागी होत यश मिळवलं. परिस्थिती सामान्य असली तरी सरावातील सातत्य, इच्छाशक्तीच्या बळावर आंतरराष्ट्रीय पातळीवरही नावलौकिक कमावता येतो, हेच सुजलनं दाखवलं आहे.
योगाभ्यासासाठी तरुणाचा असाही पुढाकार
गावातीलच राम हाडके हा तरुण चिमुकल्यांना योगाचे धडे देतो. गावात सुरू झालेल्या योगामध्ये रामनदेखील सहभाग घेतला होता. त्यामध्ये आवड निर्माण झाली. कुठलही प्रशिक्षण न घेताच राम स्वत:च योगा शिकू लागला. त्याकरिता युट्युबरील योगाचे व्हिडीओ, समाजमाध्यमांवरील योगाच्या माहितीचा उपयोग केला. त्यातूनच विद्यार्थ्यांना सहजगत्या शिकता येईलं, अशी योगासनं स्वत: शिकत विद्यार्थ्यांनाही शिकवू लागला. याच माध्यमातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांना स्पर्धांमध्येही सहभागी करतात. प्राथमिक शाळेत प्रत्येक शनिवारी योगाचे वर्ग घेतले जातात. त्यामध्ये शाळेतील अनेक विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने सहभागी होतात.
शाळेच्या विकासासाठी प्रयत्न
शाळेच्या विकासासाठी सदोदित प्रयत्न केले जात आहे. येथे चांगले विद्यार्थी, खेळाडू घडावे याकरिता आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या माजी सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य जयश्री सुनील गफाट यांनी सांगितलं.
खासदारांनी स्वीकारले खेळाचे पालकत्व
गावखेड्यातल्या सामान्य कुटुंबातील सुजलच्या यशाने अनेकांना भूरळ पाडली. वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांनी गावाला भेट देत सुजलचा गौरव केला आणि त्याच्या खेळाचं पालकत्व स्वीकारले. पुलई येथे क्रीडा भवन बांधकाम करण्यासाठी 25 लाख रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन खासदार रामदास तडस यांनी दिले.