जालना : राज्यात पाच ते सहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. जालन्यात राजेश टोपे हे पत्रकारांशी बोलत होते. तसेच मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याचं टोपेंनी आवाहन केले आहे.
टोपे म्हणाले, तरूण वर्ग हा मोठ्या प्रमाणात रक्तदान करत असतो. मात्र लॉकडाऊनच्या काळात अनेक महाविद्यालये आणि एनजीओ बंद होत्या. त्यामुळं रक्तसाठ्यावर याचा मोठा परिणाम झाला आहे. सध्या आता पाच ते सहा दिवसच पुरेल एवढाच रक्तसाठा राज्यात उपलब्ध आहे.
येत्या 12 डिसेंबरला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तरूण वर्गानं रक्तदान करण्याचं आवाहन टोपे यांनी या वेळी केलं आहे. तसेच कोरोना काळात राज्यातील रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई भासत असून राज्यातील जनतेने स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील केले आहे.
या पार्श्वभूमीवर येत्या काळात रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी राज्यातील राजकीय, धार्मिक, सामाजिक संस्था व गृहनिर्माण सोसायटी यांनी कोरोनाविषयक काळजी घेऊन छोट्या- छोट्या रक्तदान शिबीरांचे आयोजन करावे. स्वैच्छिक रक्तदात्यांनी देखील नजीकच्या रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान करावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तपेढ्यांमार्फत आवश्यक त्या तपासणी चाचण्या व प्रतिबंधक उपाययोजना करुन रक्त संकलन करण्यात येणार आहे. कोरोनाच्या काळात रुग्णांना जीवनदान देण्याकरिता सर्वांनी पुढे येऊन दर तीन महिन्यांनी रक्तदान करावे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
संबंधित बातम्या :