Agriculture Department News : गेल्या आर्थिक वर्षात कृषी विभागातील विविध योजनांवर केवळ 40 टक्केच निधी खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. फक्त दोन योजनांचा अपवाद वगळता इतर योजनांचा निधी का खर्च झाला नाही? असा सवाल आता व्यक्त केला जात आहे. आलेला निधी खर्च न होणे हे अत्यंत खेदजनक आहे. दरम्यान याबाबतची गंभीर दखल कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी घेतली आहे. धीरज कुमार यांनी सर्वच कृषी संचालकांना याबाबत काही आदेश दिले आहेत. 


कृषी विभागातील विविध योजनांपैकी फक्त दोन योजनांचा अपवाद वगळता इतर योजनांचा निधी खर्च झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. याची दखल खुद्द कृषी आयुक्तांनी घेतली आहे. योजनानिहाय मंजूर झालेली रक्कम 21 सप्टेंबर 2022 अखेर खर्च करण्यासाठी ठोस नियोजन करा, तसेच  त्याबाबतचा अहवाल सात दिवसांत सादर करा, असे आदेश कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी सर्वच कृषी संचालकांना दिले आहेत. विभागाच्या सर्व संचालकांना पत्र पाठवून संबंधित योजनांना आलेला निधी का खर्च झाला नाही? निधी खर्च होण्यात काय अडथळे आहेत? 2021-22 या आर्थिक वर्षांत विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी 264 कोटी रुपयांचा निधी आला होता. त्यापैकी मार्चअखेर फक्त 122 कोटी 93 लाख रुपयेच खर्च झाले आहेत.


संरक्षित शेती योजनेसाठी 2018-19 मध्ये 25 कोटी 69 लाखांचा निधी आला होता. त्यापैकी फक्त 6 टक्के म्हणजे 1 कोटी 55 लाख 16 हजार 964 एवढा निधी खर्च झाला आहे. 2019-20 या आर्थिक वर्षांत संरक्षित शेतीसाठी 10 कोटींचा निधी आला होता, त्यापैकी एक रुपयासुद्धा कृषी विभागाने खर्च केला नाही. हळदीच्या काढणी पश्चात व्यवस्थापनासाठी 2 कोटी रुपयांचा निधी आला होता, त्यापैकी फक्त 9 टक्के म्हणजे 18 लाख 43 हजार रुपयांचा निधी खर्च झाला आहे. अनेक खात्यांत निधी नाही म्हणून योजना रखडतात. पण कृषी खात्यात आलेला निधीही खर्च केला जात नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. सध्या ऐकीकडं राज्यातल्या शेतीच्या सर्वच योजना रखडल्या आहेत. विकेल ते पिकेल ही योजनाही सूरु झालेले नाही असे असताना कृषी विभागातील विविध योजनांवर निधी खर्च न केल्याचे समोर आले आहे.


महत्वाच्या बातम्या: