Sugarcane News : राज्यात मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र असल्याने गाळपाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हंगाम संपत आला तरी अद्याप काही जिल्ह्यामध्ये ऊस शिल्लक आहे. विशेषत: मराठवाड्यात अनेक ठिकाणी ऊस कारखान्याला गेला नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. याच पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील  गाळपाअभावी शिल्लक राहिलेल्या ऊसाच्या संदर्भाने पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हा प्रशासन, साखर आयुक्तालय व सहकारी तसेच खाजगी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनासोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी मे अखेरपर्यंत कारखाने चालवून जिल्ह्यातील संपूर्ण उसाचे गाळप करण्याचे निर्देश दिले आहेत. 




बैठकीत नेमकं काय झालं


1) सर्व साखर कारखान्यांनी जवळपासची गावे विभागून घेऊन जलद गाळपासाठीचे नियोजन करावे. 
2) सभासद व बिगस सभासद असा भेद न करता सर्वांचा ऊस गाळप व्हावा हे पहावे . 
3) सोलापूर व नांदेड जिल्ह्यातील बंद होत असलेल्या कारखान्यातील ऊस तोडणी यंत्रणा मागवून घ्यावी. 
4️) शेजारी जिल्ह्यात बंद होत असलेल्या कारखान्यातील हार्वेस्टरचे अधिगृहन करावे.
5️) लातूर जिल्हाधिकारी यांनी नांदेड व सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून तोडणी यंत्रणेच्या अधिगृहनाबाबत कार्यवाही करावी. 
6️) कारखान्याला होणारा पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी महावितरणने अखंड वीजपूरवठा करावा. 
7️) जिल्ह्यात कोणाचाही ऊस शिल्लक राहणार नाही असे सांगून शेतकऱ्यांना दिलासा दयावा. 
8️) ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. 
9️) शेतकऱ्यात चिंतेचे वातावरण निर्माण करणाऱ्या अफवा पसरवल्या जाणार नाहीत याची विशेष काळजी घ्यावी.


असे निर्देश या बैठकीदरम्यान पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. सभासद व बिगस सभासद असा भेद न करता सर्वांचा ऊस गाळप व्हावा करण्यासाठी कारखान्याच्या व्यवस्थापणाने पाहावे असे त्यांनी यावेळी सांगितले आहे. 
दरम्यान, अधिक काळ कारखाने चालवल्यामुळे कारखान्याचे होणारे नुकसान भरुन काढण्यासाठी शासनाच्या वतीने साखर उतारा घट अनुदान आणि ऊस वाहतुकीसाठी अनुदान दिले जाणार आहे. ऊस तोडणी यंत्रणा उपलब्ध करुन देण्यासाठी नांदेडमध्ये राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व सोलापूर जिल्ह्यातील आमदार बबनदादा शिंदे यांना आपण स्वतः विनंती करणार असल्याचे यावेळी अमित देशमुख यांनी सांगितले.