मुंबई : देशासह राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. अशातच कोरोनामुळे यंदा शाळा प्रत्यक्षात सुरु होण्यास अजून वाट पाहावी लागणार आहे. परंतु, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून नवं शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केला आहे. नव्या कोऱ्या वह्या-पुस्तकांसह नाही तर यंदाचं शैक्षणिक वर्ष ऑनलाइन पद्धतीने सुरु होणार आहे. असं असलं तिरीही अद्याप शिक्षण विभागाकडून कोणत्याही सुचना किंवा गाइडलाइन्स जारी करण्यात आलेल्या नाही. त्यामुळे शैक्षणिक वर्ष कसं सुरु करायचं? हा प्रश्न शिक्षक, मुख्याध्यापक, पालक यांच्यासमोर उभा राहिला आहे.


दरवर्षी जूनमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होते. यंदा मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रत्यक्षात शाळा सुरु न करता, ऑनलाईन पद्धतीने शैक्षणिक वर्ष सुरु करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच शिक्षण विभागाच्या या निर्णयानंतर पालक आणि शिक्षकांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. ऑनलाइन शिक्षण देताना अनेक शाळांना अडचणी येत असताना त्यात मुंबईत कंटेन्मेंट झोनमध्ये असलेले विद्यार्थी शिक्षण कसे घेणार? शिक्षक काय शिकवणार? याबाबत शाळांना कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. शिक्षण विभागासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक झाल्यानंतरच पुढचं नेमकं नियोजन कसे असेल याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


15 जूनला शाळा सुरु होणार नाहीत, मुख्यमंत्र्याचे आदेश : कपिल पाटील


15 जूनला शाळा सुरु होणार नाहीत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केल्याचं आमदार कपिल पाटील यांना रविवारी रात्री उशिरा सांगितले. 15 जून शिक्षकांनी शाळेत जाण्याची गरज नाही. त्यांनी वर्क फ्रॉम होम करावे. शाळा कधी सुरु करायच्या त्याचा निर्णय मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर घेण्यात येईल, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी रविवारी रात्री आमदार कपिल पाटील यांना सांगितले. दरम्यान, याआधी शाळा उद्या सुरु करण्याचे आदेश शिक्षण अधिकारी यांनी दिले होते. त्यामुळे सध्या पालक आणि शिक्षकांमध्ये प्रचंड गोंधळाचे वातावरण होते. त्यामुळे कपिल पाटील यांच्या मध्यस्थिनंतर हा संभ्रम दूर झाला असून शैक्षणिक वर्ष सुरु करण्यात आलं असलं, तरिही प्रत्यक्षात शाळा मात्र सुरु करण्यात आलेल्या नाहीत.


महत्त्वाच्या बातम्या : 


सरकारने अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करू नये, पुण्यातील नामांकित शिक्षण संस्थांची भूमिका


पुण्यात लॉकडाऊनमध्ये अकरावीची परीक्षा घेण्याचा धक्कादायक प्रकार!