मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या 3390 नवीन रुग्णांची नोंद झाली असून सध्या राज्यात 53 हजार 17 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आज 1632 रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या 50 हजार 978 झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. तर आज एकाच दिवशी 120 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंतचा मृतांचा आकडा 3950 वर पोहोचला आहे.


राज्यात 120 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईत 69, ठाणे 4, उल्हासनगर 5, पालघर 1, वसई-विरार 1, पुणे 11, सोलापूर 3, नाशिक 3, जळगाव 11, रत्नागिरी 1, औरंगाबाद 7, उस्मानाबाद 2, अकोला येथे 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 81 पुरुष तर 39 महिला आहेत. आज नोंद झालेल्या 120 मृत्यूपैकी  60 वर्षे किंवा त्यावरील 66 रुग्ण आहेत तर 40 रुग्ण हे वय वर्षे 40  ते 59 या वयोगटातील आहेत. तर 14 जण 40 वर्षांखालील आहे. या 120 रुग्णांपैकी 80 जणांमध्ये (67 टक्के) मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 3950 झाली आहे.


आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी 43 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू 2 जून ते 11 जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील 77 मृत्यूंपैकी मुंबई 58, जळगाव – 8, नाशिक - 3, ठाणे - 3, उल्हासनगर - 3, रत्नागिरी - 1, पुणे 1 मृत्यू असे आहेत.


राज्यात सध्या 55 शासकीय आणि 42 खाजगी अशा एकूण 97 प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 6 लाख 57 हजार 739 नमुन्यांपैकी 1 लाख 7 हजार  957 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात  5 लाख 87 हजार 596 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात 1535 संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये  77 हजार 189 खाटा उपलब्ध असून सध्या 29 हजार 641 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


Coronavirus | बीडमध्ये चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांविरोधात गुन्हा दाखल