बीड : ड्युटीसाठी चेक पोस्टवर असलेल्या शिक्षकाचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना बीड जिल्ह्यात घडली. शिरुर जवळच्या तागडगाव फाट्यावर रविवारी (14 जून) रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला. प्रशांत डी. कुलकर्णी असं या शिक्षकाचं नाव असून ते लोणीतील शाळेत कार्यरत होते. मात्र सध्या ते बीडमधल्या प्रगती विद्यालयात डेपोटेशनवर होते.
राज्यभरात शाळा बंद आहेत. त्यामुळे शाळेतील शिक्षकांना वेगवेगळ्या प्रकारची कामं देण्यात आली आहेत. अगदी रेशन दुकानावरील धान्याच्या नोंदी ठेवण्यापासून ते किराणा घरपोच करण्याऱ्या डिलिव्हरी बॉयप्रमाणे काम शिक्षकांना करावं लागत आहेत. चेकपोस्टवर बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्तींची नोंद घेण्याचे काम सुद्धा मागच्या दोन अडीच महिन्यांपासून शिक्षक करत आहेत.
या अपघातात मृत्युमुखी पडलेले शिक्षक बीड आणि नगरच्या सीमेवर असलेल्या मानूर येथील चेक पोस्टवर कार्यरत होते. काल रात्री साडेसात वाजता ड्युटी संपल्यानंतर ते स्वत:च्या स्विफ्ट कारमधून बीड इथल्या आपल्या घरी निघाले होते. मात्र रस्त्यातच काळाने त्यांच्यावर घाला घातला.
रायमोह ते शिरुर रस्त्यावर तागडगांव फाट्याजवळ टाटा सुमो आणि स्विफ्ट कारची जोरदार धडक होऊन हा अपघात झाला. या अपघातात शिक्षक प्रशांत डी कुलकर्णी यांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची नावे समजली नाहीत. त्यांना उपचारांसाठी बीडमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि याची माहिती पाटोदा पोलिसांना दिली.
हा अपघात इतका भीषण होता की ड्रायव्हिंग सीटवर बसलेले प्रशांत कुलकर्णी स्वतःच्या बचावासाठी उठून सुद्धा शकले नाहीत. मृतदेह शवविच्छेदनासाठी रायमोह ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
चेकपोस्टवरील कालची ड्युटी शेवटची ठरली
प्रशांत कुलकर्णी हे मानूरच्या चेक पोस्टवर कार्यरत होते. साडेसात वाजेपर्यंत कुलकर्णी यांनी ड्युटी केली ते घरी परतत होते आणि त्यातच त्यांचा अंत झाला. चेकपोस्टवरील ड्युटीचा कालचा त्यांचा शेवटचा दिवस ठरला.