नाशिक : पाच पैशाचं नाणं कधी चालायचं बंद झालं हे आता कोणालाही आठवण्याची शक्यता नाही. पण या पाच पैशाने नाशिकमधील सायखेडा बाजारात शेतकऱ्याला आयुष्यभर पुरेल इतकं दु:ख दिलं. इथे कांद्याला फक्त पाच पैसे प्रतिकिलोचा दर मिळाला.

 

कांद्याच्या भावात आज ऐतिहासिक पडझड झाली आणि पिंपळगावच्या सायखेडा उपबाजार समितीत सुधाकर दराडे नावाच्या शेतकऱ्याला फक्त 5 पैसे किलोचा भाव मिळाला. 5 रुपये प्रति क्विंटल कांदा विकावा लागणार, या भावनेने हताश झालेल्या दराडेंनी कांदा न विकता परत आणला आणि उद्विग्न होऊन खत म्हणून तो शेतात फेकून दिला.

 

आठ दिवसापूर्वीच केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्याचा कांदा विकत घेण्याची तयारी केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला होता. मात्र कष्टाने पिकवलेला,  आठ महीने दुष्काळ, संप, आंदोलन, अतिवृष्टीच्या संकटापासून जगवलेला कांदा मातीमोल होताना पाहण्याची वेळ नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे