पुणे/उस्मानाबादः महाराष्ट्राची कुलस्वामीनी तुळजाभवानीला भाविकांनी श्रद्धेनं वाहिलेलं 39 किलो सोनं आणि 608 किलो चांदी लुटून नेली. हा अपहार 42 लोकांनी मिळून 1991 ते 2010 या 20 वर्षात केला. हे दान कोणी लुटून नेलं याची सीआयडी चौकशी सुरु होती. त्याचा अंतिम अहवाल 'माझा'ने पुण्याच्या सीआयडी मुख्यालयातून मिळवला. या अहवालाने महसूल विभागात जोरदार भूकंप होण्याची शक्यता आहे.

 

9 उपविभागीय अधिकारी, 9 तहसिलदारांसह 10 ठेकेदार आणि मंदिराचा कारभार पाहणारे 14 कर्मचारी तुरुंगात जाऊ शकतात. यातील काही अधिकारी मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत होते, तर काही अधिकारी शरद पवारांचे सचिव आहेत. 11 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांना मात्र खातेअंतर्गत कारवाईची शिफारस करून सीआयडीने हात झटकले आहेत.

 

काँग्रेसचे आमदार मधुकरराव चव्हाण आणि 9 नगराध्यक्षांवर राज्य सरकारला कारवाई करायची आहे. सोन्या-चांदीच्या मुल्यांचे जे निकष सीआयडीने लावले आहेत. त्यातून दिसतं की लुटीचं गांभीर्य कमी करण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न झाला आहे.

 

काय सांगतो अहवाल?

 

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या देवीच्या दागिन्यांच्या गैरव्यवहाराची सीआयडी चौकशी 2012 पासून सुरु होती. यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. उस्मानाबादचे तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल पवारांनी 1991 साली दानपेट्यांचा लिलाव करण्याची पद्धत स्वीकारली. सुरुवातीला तीनच दानपेट्यांचा लिलाव होणार होता. हळूहळू तो आकडा 7 वर गेला.

 

कोंडाळं करुन 12 लोक दानपेट्यांचा लिलाव होत राहिला. रोडच्या धार्मिक कार्यालयात दानपेट्या उघडण्याची अट असताना तब्बल 20 वर्षे नारळाच्या खोलीत दानपेट्या उघडल्या गेल्या. याचे बोगस पंचनामे तयार झाले आणि सोन्या-चांदीची लूट झाली.

 

असा झाला घोटाळ्याचा पर्दाफाश

 

उस्मानाबादला प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी म्हणून आले आणि सगळा गैरव्यवहार समोर आला. एके दिवशी ठेकेदाराला बाजूला सारुन दान पेट्यांमधलं उत्पन्न मोजलं. त्या दिवसाचं उत्पन्न 99 हजार 564 रुपये म्हणजे वार्षिक 3 कोटी 63 लाख 40 हजार रुपये निघाले.

 

त्यावर्षी दानपेट्यांचा लिलाव 2 कोटी 67 लाखांचा झाला होता. म्हणजे एकाच वर्षी मंदिराचं 96 लाखाचं नुकसान झालं. याप्रकरणाची चौकशी सुरु झाली आणि सर्वप्रथम सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी, नंतर स्पेशल ऑडिटर्सनी अहवाल दिला.

 

गृह सचिवांनी 14 डिसेंबर 2014 ला सीआयडी चौकशीचे आदेश दिले. पण मंदिर व्यवस्थापनाने सहकार्य केलं नाही. अहवाल न मिळाल्याने सीआयडीने 2010 पासून उतरत्या क्रमाने 15 टक्के घट गृहित धरुन सोनं किती आलं असावं याचा अंदाज बांधला.

 

सीआयडीच्या दाव्यानुसार 20 वर्षात 39 किलो सोने आणि 608 किलो चांदी लुटली गेली आहे. परंतु त्याकाळी सोन्या-चांदीचे दर काय होते, यावर अपहाराचा आकडा निश्चित केल्याने अपहार फक्त 7 कोटी 19 लाखांचा झाला आहे.

 

कोणाकोणावर होणार कारवाई?

 

तुळजाभवानी मंदिराचा कारभार निजामाच्या जीआरनुसार चालतो. त्यात बदल झालेला नाही. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी अध्यक्ष, तुळजापूरचे आमदार, नगराध्यक्ष, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार सदस्य आहेत. त्यानुसार सीआयडीने 42 अधिकारी कर्मचाऱ्यांवर घोटाळ्याचा आरोप ठेवला आहे.

 

सीआयडीच्या यादीत 9 उपविभागीय अधिकारी, 9 तहसिलदार, 10 ठेकेदार, मंदिरातील 14 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सीआयडीने या सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल कऱण्याची शिफारस केली आहे.

 

काँग्रेसचे विद्यमान आमदार मधुकर चव्हाण यांच्यावरही निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. मात्र त्यांच्यासह 8 माजी नगराध्यक्षांवर कारवाईची जबाबदारी सीआयडीने राज्य सरकारवर दिली आहे.