मुबंई : कांद्यासाठी प्रसिद्ध परिवहन केंद्र असलेला मध्य रेल्वेचा भुसावळ विभाग आता बांगलादेशात कांद्याची निर्यात करत आहे. कांद्याचा पहिली मालगाडी 6 मे रोजी लासलगाव येथून निघाली. कोविड 19 हा साथीचा आजार सर्वत्र पसरल्यापासून रेल्वेने डॅमरेज आणि व्हारफेज शुल्कामध्ये सूट, मिनी रॅक्सच्या बुकिंगसाठी अंतर निर्बंधात सूट आणि टू पॉईंट रॅक (मालगाडी), प्रमाणित रेक रचनेत इत्यादी सवलीतींची घोषणा केली आहे.


वाणिज्य आणि ऑपरेटिंग विभागांकडून संभाव्य लोडर्ससह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सखोल विपणन बैठका घेण्यात आल्या. यामुळे बांगलादेशात (डारसाणा, बेनापोल आणि रोहनपूर स्थानकांत) कांद्याची निर्यात सुरू झाली. भुसावळ विभाग भारतीय रेल्वेवरील फूटुहा, डानकुनी, चांगसारी, मालदा टाऊन, चितपूर इत्यादी विविध स्थानकांवर पाठवण्यासाठी कांदा लोड करतो.


कांद्याची निर्यात सुरू झाली आणि लासलगाव येथून प्रथम रेक (मालगाडी) 6 मे रोजी निघाला. कांदाचा दुसरा व तिसरा रेक खेरवाडी व निफाड येथून बांगलादेशातील दरसाना येथे पाठवला गेला. लासलगाव ते बांगलादेशातील दरसाना येथे आणखी 6 मालगाडी (रॅक्स) लवकरच पाठवण्यात येणार आहेत. जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून भार भरणाऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. केंद्र व राज्य सरकारांनी दिलेल्या आदेशानुसार सामाजिक अंतर राखून आणि स्वच्छताविषयक पद्धतींचा पालन करून मालगाडी लोड केल्या जात आहेत.


लॉकडाऊनदरम्यान मध्य रेल्वेने एक लाखांपेक्षा जास्त वॅगनची मालवाहतूक केली. मध्य रेल्वेने मुंबई, नागपूर, भुसावळ, सोलापूर आणि पुणे विभागातील वचनबद्ध कर्मचार्‍यांच्या माध्यमातून लॉकडाऊन कालावधीत अन्नधान्य, वीज निर्मितीसाठी कोळसा आणि इतर वस्तू यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या 1,07,698 वॅगन लोड केल्या आहेत. 24×7 सतत काम करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी 23 मार्च ते 8 मे या कालावधीत 2 हजार 192 रॅकमध्ये हे लोड करणे शक्य केले आहे.


मध्य रेल्वेच्या मुंबई, नागपूर, भुसावळ, सोलापूर आणि पुणे विभागात एकंदर 39 हजार 892 वॅगनमध्ये कंटेनर, 46 हजार 471 वॅगनमध्ये कोळसा, 505 वॅगन मध्ये धान्य, 626 वॅगनमध्ये साखर, 9355 वॅगन्समध्ये पेट्रोलियम उत्पादने, 3770 वॅगनमध्ये खते, 1213 वॅगनमध्ये स्टील, 336 वॅगनमध्ये डी-ऑइल केक आणि 1613 वॅगनमध्ये सिमेंट व 3792 वॅगनमध्ये विविध वस्तू भरल्या गेल्या.