पन्हाळा तालुक्यातील हे आहे कोलोली हे गाव कोल्हापूर पासून साधारण तीस किलोमीटर अंतरावर कासारी नदीच्या तीरावर वसलेलं आहे. आज संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात आनंदात दिवाळी साजरी होत आहे , मात्र गावात दिवाळी निमित्त नवीन कपडे , आकाश कंदील , फराळ मात्र नाही आहे. दररोज आपण ज्या पद्धतीने आपले जीवन व्यतीत करतो त्याच पद्धतीने या गावातील नागरिक सध्या आपल्या कामामध्ये मग्न आहेत, कारण ते ही दिवाळी साजरी करत नाहीत.
कोलोली गावाची ग्रामदेवता गाडाई देवी आहे. गाडाई देवीचे एक पुरातन मंदिर गावाच्या मध्यभागी आहे. हे मंदिर जागृत असल्यामुळे भाविक देवीला एखादा नवस बोलले तर देवीच्या समोरील कासवा जवळ चमड्याचे एक जोड चप्पल ठेवतात. जे भक्त या देवीला नमस्कार करण्यासाठी मंदिरात येतात ते या चमड्याचे चप्पल आपल्या गालावर आणि माथ्यावर मारून घेऊन देवीला नमस्कार करतात, अशी पद्धत या गावात आहे. या देवीची यात्रा म्हणजेच या गावात 'देव दीपावली' म्हणून साजरी केली जाते. गोडधोड फराळ , नवीन कपडे घरांसमोर आकाश कंदील हे करत असताना या गावाला याच दिवशी यात्रेचे स्वरूप प्राप्त होतं आणि इथूनच पंचक्रोशीमध्ये यात्रा सुरू होतात. या गावात दिवाळी का साजरी करत नाहीत आणि देवी चे महत्व काय आहे यासंदर्भात ही दोन अख्यायिका आहेत.
या गावात एखादी मुलगी लग्न करून आली की तिला सुरुवातीला माहेरी दिवाळीसाठी, भाऊबीजेसाठी माहेरी नेलं जातं. मात्र तिच्या माहेरी जेव्हा दिवाळी साजरी केली जाते, त्यावेळी सासरी मात्र दिवाळी होत नाही. त्यामुळे नवीन लग्न झालेल्या मुलींना ही प्रथा थोडी विचित्र वाटते. यावेळी आपल्या माहेरची ओढ त्यांना लागलेली असते पण गावची परंपरा असल्याने त्या काही करू शकत नाहीत. दिवाळी संपल्यानंतर कोलोली गावची दिवाळी मात्र त्याच उत्साहाने करतात.
प्रत्येक गावाची आपलीशी एक वेगळी प्रथा आणि परंपरा असते . संपूर्ण भारत वर्षांमध्ये या प्रथा आणि परंपरा जोपासल्या जातात. दिवाळी असूनही दिवाळी न साजरी करणाऱ्या या गावाने आज ही आपले वेगळेपण टिकून ठेवले आहे. आज आपण कितीही शिकलो , सवरलो असलो तरीही गावाकडील ग्रामस्थ मात्र पूर्वापार चालत आलेल्या परंपरा मोठ्या उत्साहानं आणि आवडीनं जोपासत आहेत. त्यामुळेच या परंपरा आजही आपलं वेगळं स्थान टिकवून आहेत.