बुधवारी रात्री ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून राजेश पाटील आणि राजेश फाळके यांच्यात जोरदार वादावादी झाली. निवडणुकीत अनुसूचित समाजातील मते पडली नाहीत यावरून या वादाला तोंड फुटले. याच रागातून पाटीलने फाळकेला बेदम मारहाण केली. या मारहाणीत फाळके गंभीर जखमी झाला. जखमी राजेश फाळकेला सांगलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी युवक राष्ट्रवादी तासगाव तालुकाध्यक्ष राजेश पाटील विरोधात अॅट्रॉसिटी व खून असे दोन गंभीर गुन्हे दाखल दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान जोपर्यंत आरोपी राजेश पाटीलला अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका राजेश फाळकेच्या कुटुंबियांनी घेतलीय. सांगली सामान्य रुग्णालयासमोर राजेश फाळकेच्या नातेवाइकांनी मोठी गर्दी केली.
या खूनाच्या घटनेच्या निषेधार्थ बहुजन समाजकडूज आणि इतर संघटनांकडून वायफळे आणि तासगाव तालुक्यात बंद पुकारण्यात आला आहे.