नांदेड : मेथीची भाजी खाल्ल्याने विषबाधा होऊन एका वृद्धाचा मृत्यू झाला तर त्याच कुटुंबातील अन्य सहा जणांवर उपचार सुरू आहेत. उमरी तालुक्यातील कळगावमध्ये ही घटना घडली आहे. धोंडिबा कदम असं विषबाधेतून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते 65 वर्षाचे होते.


कदम कुटुंबियांनी गुरुवारी सकाळी मेथीची भाजी आणि भाकरी खाल्ली होती. नंतर सर्वजण शेतात कामाला देखील गेले. सायंकाळी मात्र धोंडिबा कदम यांना चक्कर येऊन पोटात मळमळ आणि उलट्याचा त्रास सुरू झाला. त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या कुटुंबातील पद्मिनी कदम, आनंदा कोंडीबा यांना देखील असाच त्रास सुरू झाला. या तिघांना उमरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रात्रीतून आणखी चार जणांना उलट्यांचा त्रास झाल्याने त्यांना देखील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्रभर सर्वांवर उपचार करण्यात आले. शुक्रवारी मात्र उपचारादरम्यान कोंडीबा कदम यांचा मृत्यू झाला. अन्य सहा जणांना नंतर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं.

दरम्यान कदम कुटुंबियांनी त्या दिवशी उमरी येथील बाजारातून मेथीची भाजी आणली होती, असे नातेवाईकांनी सांगितले आहे. तीच भाजी बनवून सर्वांनी खाल्ली. कदम कुटुंबियांसह गावातील आठ दहा घरांना एकाच नळातून पाणी मिळतं, म्हणून पाण्यातून विषबाधा झाल्याचं संशय आला. मात्र पाण्यातून नव्हे तर जेवणातून विषबाधा झाल्याचा आरोग्य विभागाचा अंदाज आहे.

आरोग्य विभागाच्या पथकाने पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. त्यांच्या पोटातील अन्न कण तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेतील अहवालानंतरच विषबाधेचं नेमकं कारण स्पष्ट होईल, असं डॉक्टरांनी सांगितलं.

यापुर्वीही जळगावमध्ये एका महिलेचा कच्ची मेथी खाल्ल्याने मृत्यू झाला होता.

संबधित बातमी

मेथीची भाजी कच्ची खाल्ल्याने महिलेचा मृत्यू