नाशिक : लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र घेणं म्हणजे भाजपसाठी फावडं-कुऱ्हाड एकाचवेळी पायावर मारुन घेण्यासारखं आहे. त्यामुळे लोकसभा-विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी होणार नाहीत, असा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. नाशिकच्या दौऱ्यानंतर राज ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला.
राज ठाकरेंनी अनेक मुद्दयावर दिलखुलास उत्तरं दिली. मुलगा अमितचं लग्न अत्यंत साधेपणानं होणार असल्याचंही राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं. सर्वपक्षांच्या हितचिंतकांना आमंत्रण दिलं, तर तो आकडा सहा लाखांच्या घरात जातो. त्यामुळे उगाच वधू-वराची ससेहोलपट नको. म्हणून मोजक्याच लोकांना निमंत्रण दिल्याचंही सांगत राज यांनी दिलगिरी व्यक्त केली.
मोदींना लग्नाचं आमंत्रण देणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लग्नाचं निमंत्रण देणार का? असा प्रश्न पत्रकारांनी राज ठाकरे यांना विचारला. त्यावर 'त्यांचा लग्न या गोष्टीवर विश्वास आहे का?' असा प्रतिप्रश्न करत राज ठाकरे निघून गेले.
लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र होणार नाहीत. भाजप फावडं आणि कुऱ्हाड एकाचवेळी पायावर मारुन घेणार नाहीत. त्यामुळे आधी फावडं (लोकसभा) मारुन घेतील, नंतर कुऱ्हाड (विधानसभा) असं सूचक वक्तव्य राज ठाकरेंनी केलं.
मोदींनी स्वतःसाठीच खड्डा खणला
नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्याचं तेव्हा बाळा नांदगावकरांनी मला सांगितलं होतं. तेव्हा माझी पहिली प्रतिक्रिया होती- मोदींनी आपला राजकीय खड्डा खणला. नोटाबंदीच्या वाईट परिणामांबद्दल सांगणारा मी देशातला कदाचित पहिलाच होतो. भाजप स्वतःच स्वतःचे राजकीय खड्डे खणत आहे, जसजशा निवडणुका जवळ येतील, तसतसे सत्ताधारी आणखी चुका करतील, असंही राज ठाकरे म्हणाले.
आधी पैसे काढले, आता लोकांच्या घरात घुसणार का? असं म्हणत मोबाईल कॉल आणि इंटरनेट डेटावरील सरकारी पहाऱ्यावर राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.
राम मंदिरावरुन दंगली घडवण्याचा सरकारचा कट आहे. सरकारकडे रुपयाही शिल्लक नसून केवळ घोषणाबाजी सुरु आहे, असं सांगतानाच पैसा नाही, मग कशाच्या जोरावर कांद्याला अनुदान जाहीर केलं? असा सवालही राज ठाकरेंनी विचारला.
दौऱ्यात नाशिककरांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या गर्दीवरुन जनतेचा शिवसेना-भाजपवरील विश्वास उडाल्याचं दिसत असल्याचं राज ठाकरे म्हणाले. येत्या निवडणुकीत शिवसेना-भाजपची दुर्दशा होईल, असं भाकितही त्यांनी यावेळी वर्तवलं.
तीन राज्यांमधील पराभव हा मोदींवरचा राग आहे. जनतेने आपला राग मतांच्या माध्यमातून व्यक्त केला, अशी टीकाही राज ठाकरेंनी केली. काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा आताचं सरकार बेकार असल्याचंही राज ठाकरे म्हणाले.
लोकसभा-विधानसभा एकत्र होणार नाहीत : राज ठाकरे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Dec 2018 12:34 PM (IST)
मुलगा अमितचं लग्न अत्यंत साधेपणानं होणार असल्याचंही राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं. सर्वपक्षांच्या हितचिंतकांना आमंत्रण दिलं, तर तो आकडा सहा लाखांच्या घरात जातो, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -