मुंबई : गणेशोत्सवासाठी राज्यातल्या बाजारपेठा फुलल्या आहेत. विविध जिल्ह्यांमध्ये फुलांची आणि सजावटीच्या साहित्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सकाळपासूनच राजधानी मुंबईसह राज्यभरातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये खरेदीची लगबग दिसून आली.

मुंबई

गणपती येणार असल्याने आज सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. दादरच्या फूल मार्केट परिसरात ग्राहक आणि विक्रेते यांची गर्दी दिसून आली. सकाळी सहा वाजल्यापासूनच फुले, सजावटीचे सामान घेण्यासाठी मुंबई आणि आसपासच्या विभागतून ग्राहक दादरला आले. मात्र या वर्षी प्लास्टिक आणि थर्माकोल नसल्याने फुलांच्या मागणीला जोर आहे. त्यामुळे फुलांची किंमतही वाढली आहे.

कल्याण

बाप्पाचं आगमन म्हटलं, की त्याला वाद्यांची साथ ही ठरलेलीच.. बाप्पाचं आगमन हे वाजत गाजत, ढोल ताशांच्या गजरात केलं जातं. आणि यामुळेच गणेशोत्सवात ढोल पथकांनाही रोजगाराची संधी उपलब्ध होते.

कल्याणच्या गणेशोत्सवासाठी दरवर्षी नाशिकहून ढोलपथकं दाखल होत असतात. नाशिक आणि आसपासच्या ग्रामीण भागातून या ढोलपथकात वादक सहभागी होतात. गणपतीच्या दोन दिवस आधी हे वादक कल्याणमध्ये येतात आणि दहा दिवस कल्याणमध्येच मुक्काम ठोकतात. 1980 सालापासून दरवर्षी ही ढोल पथकं कल्याण मुक्कामी येतात. या काळात जितकं उत्पन्न मिळेल, त्यावर त्यांची काही दिवस गुजराण होते.

पंढरपूर

गणरायाच्या आगमनाची सध्या सर्वत्र धुमधडाक्यात तयारी सुरु असताना पंढरपुरातील एका गृहिणीने इको फ्रेंडली गणपतीच्या पुढची अफलातून संकल्पना समोर आणली असून त्यांनी चक्क कुंडीतील बाप्पा बनवले आहेत. गणरायाच्या विसर्जनानंतरही या कुंडीतील रोपट्याच्या रूपात बाप्पा कायमस्वरूपी आपल्या घरातच राहणार आहेत.

प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या गणपतींची विसर्जनानंतर होणारी दुरावस्था, पर्यावरणाचा होणारा ऱ्हास या सगळ्याचा विचार करून संगीता साबळे या गृहिणीला ही कुंडीतील गणपतीची संकल्पना सुचली आणि गेल्या सहा महिन्यापासून त्यांनी यावर काम करण्यास सुरुवात केली.

कोल्हापूर

गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला कोल्हापुरातील विविध मंडळं आपल्या लाडक्या बाप्पाला वाजत गाजत घेऊन जात आहेत. मात्र या मिरवणुकीत कागदाच्या लगद्यापासून बनवलेली पाच फुटाची पर्यावरणपूरक गणेश मूर्ती काही कार्यकर्ते 15 किलोमीटर डोक्यावरून घेऊन जात आहेत. केवळ दीड चमचा रंगापासून या मूर्तीला सजवण्यात आलेलं आहे.

नंदुरबार

वर्षभर आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची भाविक वाट पाहत असतात. गणेशोत्सवाची चाहूल गेल्या अनेक दिवसांपासून पाहायला मिळत होती. काही तासात आपल्या लाडक्या बाप्पाची स्थापना होणार आहे. नंदुरबारमध्ये बाजारपेठा फुललेल्या पाहायला मिळत आहेत. गणेशभक्त सकाळपासूनच साहित्य खरेदीसाठी घराबाहेर पडले होते.

नंदुरबार जिल्हा गुजरात आणि मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागातील जिल्हा येतो. त्यामुळे गुजरात आणि मध्यप्रदेशातून भाविक मूर्ती खरेदी करण्यासाठी गर्दी करतात.

सांगली

गणरायाच्या आगमनासाठी सांगली नगरी सज्ज झाली आहे. गणरायाच्या सजावटीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारपेठा फुलून गेल्या आहेत.  गणेश मूर्ती, कागदी फुले, रंगबेरंगी माळी, कापडी वस्तू,  गनोबा अशा विविध प्रकारच्या वस्तू या बाजारात दिसून येत आहेत. थर्माकोल आणि प्लास्टिकवर बंदी असली तरी काही थर्माकोल आणि प्लास्टिकच्या वस्तू बाजरात दिसत आहेत. ग्राहक याच वस्तूंना पसंती देत असल्याचं चित्र सांगलीत आहे. तर काही दुकानात थर्माकोल आणि प्लास्टिकच्या वस्तूंना पूर्णपणे फाटा देण्यात आल्याचं पाहायला मिळालं.

नाशिक

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये फुलांच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. शंभर रुपयांपासून ते हजार रुपये किलो दराने फुलांची विक्री होत आहे. झेंडूची फुले शंभर रुपये किलो दराने विकली जात आहेत. तर मोगरासाठी तब्बल हजार रुपये मोजावे लागत आहेत. पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे फुलांच्या किमतीतही 20 ते 25 टक्के वाढ झाली आहे.

पुणे

पुण्यातही बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी झाली आहे. गणेशोत्सव सुरळीत पार पडावा यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. शहरात गणेशोत्सवात सात हजार अधिकारी-कर्मचारी पोलिसांचा पहारा राहणार असून मध्य भागात मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

गर्दीत चोरी, छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी खास पथके तयार करण्यात आली आहेत.

शहरात नोंदणीकृत 3245 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत.

दोन अतिरिक्त पोलीस आयुक्त, 10 उपायुक्त, 36 सहाय्यक आयुक्त, 200 पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक मिळून 525 अधिकारी तैनात असतील.

गृहरक्षक दलाचे 500 जवान, राज्य राखीव पोलीस दलाच्या तीन तुकड्या बंदोबस्तासाठी पोलिसांना मदत करणार आहेत.

गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी बेलबाग चौक, मंडई, मध्य भागात मोठी गर्दी होते. या भागात महिला, भाविकांचे दागिने, मोबाईल चोरीचे प्रकार होत असतात. यावरही पोलिसांचं लक्ष राहणार आहे.

पोलिसांकडून दामिनी पथक तयार करण्यात आले आहेत.

शहरात बसवण्यात आलेल्या 1247 सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून गणेशोत्सवावर पोलिसांची नजर राहणार आहे. या सीसीटीव्हीचं नियंत्रण कक्ष आयुक्तालयात असणार आहे.

8 बीडीडीएस पथके 24 तास तैनात असतील. तर ड्रोनची नजर राहणार आहे.

रायगड

गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेश मूर्तींच्या मागणीत वाढ झाली आहे. उद्यापासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त रायगड जिल्ह्यातील पेण बाजारपेठेत लगबग वाढली आहे. यंदा दागिन्यांनी नटलेल्या गणेशमूर्त्यांची मागणी वाढल्याचं मूर्तीकारांचं म्हणणं आहे.

बाप्पाच्या या विविध रुपांची मागणी करताना कुणाला बाळ गणेश आवडतो,  कुणाला शंकररुपी, तर कुणाला विठुरायामध्ये बाप्पाचं रूप दिसतं. त्यातच, गेल्या दोन वर्षांपासून गणपतीच्या या मूर्तीवर दागिन्यांचा साज चढवण्याची मागणी देखील वाढू लागली आहे. यामुळे, दागिन्यांच्या या सजावटीसाठी महिला कलाकारसुद्धा बाप्पाच्या कामात तल्लीन होत आहेत. गणेशोत्सवाला एक दिवस उरल्याने अनेक भाविकांनी आपला बाप्पा आपल्या घरी नेण्यासाठी आज पेणच्या बाजारपेठेत गर्दी केली होती.

गोव्यातल्या बाजारपेठाही गजबजल्या

कोकणाप्रमाणे गोव्यात देखील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सगळ्या बाजारपेठा गजबजून गेल्या आहेत. गोव्यात गणेश सजावटीसाठी माटोळी बांधली जाते. त्यासाठी लागणाऱ्या नैसर्गिक वस्तूंचे माटोळी बाजार सगळीकडे भरले असून त्यात साहित्य खरेदी करण्यासाठी गणेशभक्त गर्दी करू लागले आहेत.