बीड : बीड जिल्ह्यात यापूर्वी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा संघर्ष आपण बघितला. त्यांच्यानंतर त्यांच्या कन्या पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे यांचा संघर्ष तर सर्वश्रूत आहे. मात्र आगामी काळात जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये मुंडे विरुद्ध मुंडे असा नवा संघर्ष आता पाहायला मिळणार आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे सख्खे चुलत भाऊ अजय मुंडे आणि रामेश्वर मुंडे हे एकमेकांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
कोण आहेत अजय, रामेश्वर मुंडे?
अजय मुंडे आणि रामेश्वर मुंडे हे धनंजय आणि पंकजा मुंडेंचे सख्खे चुलत भाऊ आहेत. ज्यावेळी धनंजय मुंडेंनी बंड करून आपला वेगळा मार्ग पत्करला, त्यावेळी अजय मुंडे हे धनंजय मुंडे गटासोबत आले.
युवक राष्ट्रवादीत प्रदेश सरचिटणीस म्हणून ते सध्या काम पाहतात. या पूर्वी नाथ्रा ग्रामपंचायतचे ते बिनविरोध सरपंच राहिले आहेत. आता जिल्हा परिषदेच्या आखाड्यात त्यांचा सामना रामेश्वर मुंडेंसोबत असणार आहे.
धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर रामेश्वर मुंडे हे पंकजा मुंडेंसोबतच राहिले. मात्र अजय मुंडे यांच्या तुलनेत रामेश्वर राजकारणात नवखे आहेत. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातील गावात ही लढत होणार असल्याने शेतकरी आपल्यालाच मतदान देतील, असं रामेश्वर मुंडेंना वाटतं.
गेल्या पाच वर्षांपासून परळीच्या सर्व छोट्या मोठ्या निवडणुकीत पंकजा आणि धनंजय यांचा सामना झालेला आहे. परळी नगरपालिकेत सत्ता कायम सोबत ठेवण्यात धनंजय मुंडेंना यश आल्याने त्यांच्यातील आत्मविश्वास नक्कीच वाढलाय. म्हणूनच परळीच्या पिंपरी बुद्रुक या जिल्हा परिषद गटात हे दोन्ही मुंडे बंधू निवडणुकीचं मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
धनंजय मुंडे हे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आहेत, तर पंकजा मुंडे या राज्याच्या ग्रामविकास मंत्री आहेत. त्यामुळे राजकारणात दोघांचा संघर्ष महाराष्ट्राने पाहिला आहे. मात्र आता परळीतच पुन्हा भाऊबंदकीची लढत होणार आहे. त्यामुळे या लढतीत कुणाचा विजय आणि कुणाचा पराभव होतो, ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.