मंगळवेढा : आज बाप्पाच्या आगमनाचे ( Ganeshotsav 2022) जगभर स्वागत होत असताना मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील गणेश मंदिर परिसरातील फरशांची तोडफोड  केल्याने भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.  तोडफोडीनंतर तातडीने या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. माचणूर येथे पाच हजार वर्षापूर्वीचे महादेवाचे अतिशय पुरातन मंदिर असून पुराणकाळातील शुकाचार्य ,वामदेव, स्वामी समर्थांपासून शंकर महाराजांपर्यंत अनेक ज्येष्ठ ऋषीमुनी आणि संतांनी येथे उपासना केल्याचे दाखले पुराणात सापडतात. सध्या हे मंदिर जीर्ण झाले असून याचा कारभार पुरातत्व विभागाकडे आहे. मात्र अनेकवेळा तक्रारी करून देखील पुरातत्व विभाग याकडे लक्ष देत नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थांच्या आहेत.


महादेवाच्या मंदिरात गणेशाचेही पुरातन मंदिर असून येथे मोठ्या प्रमाणात घाण साचत असल्याने एका भाविकाने या ठिकाणी मूर्तीच्या मागे आणि पुढील बाजूस फारशा बसवून घेतल्या होत्या . यासाठीही पुरातत्व विभागाला आधी अनेकवेळा तक्रारी करूनही पुरातत्व विभागाने दाखल न घेतल्याने एका भाविकाने या फारशा बसवून घेतल्या होत्या. आज पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी माचणूर मंदिरात येऊन कोणालाही न सांगता थेट गणेश मंदिर परिसरात तोडफोड करण्यास सुरूवात केली.स्थानिक भाविक आणि पुजारी विरोध करू लागताच काम थांबवण्यात आले.




आजच्या दिवशी केल्याने भाविकांच्या संतापाची लाट उसळली आहे. जरी पुरातत्व विभागाच्या नियमाविरोधात ही फारशी लावली असली तरी यामुळे या मंदिराचे आणि गाभाऱ्याचे पावित्र्य जपले जात होते, असे असताना पुरातत्व विभागाने आज गणेश चतुर्थीलाच येथे उत्खनन केल्याने भाविक संतप्त झाले असून ग्रामस्थांनी या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.




 या ठिकाणी चार वर्षे  औरंगजेब याची राजधानी होती. त्याकाळी औरंगजेबाने महादेवाला गोमांसाचा नैवेद्य दाखविण्याचा प्रयत्न केल्यावर या नैवेद्याची फुले झाल्याची आख्यायिका आहे . यानंतर संपूर्ण राज्यात हिंदूंची धार्मिक मंदिरे तोडणाऱ्या औरंगजेबाने माचणूरच्या मंदिराला दिल्ली दरबारातून बिदागी सुरु केली होती . आजही हैदराबाद संस्थानाकडून या मंदिराला दरवर्षी श्रावणात बिदागी येते. वास्तविक हे मंदिर पुरातत्व विभागाकडे गेल्यापासून याच्या मजबुतीसाठी या विभागाने काय केले असा सवाल करत यापूर्वी शेकडो वर्षांपासून स्थानिक भाविकांनीच या मंदिराची डागडुजी आणि जोपासना केली असल्याचा दावा ग्रामस्थ करत आहेत.




पुरातत्व विभागाच्या नियमाचा जरी भंग झाला असला तरी किमान  तोडफोड करण्यापूर्वी  गणेशचतुर्थीला अशी  कारवाई करणे कितपत योग्य होते असा सवाल आता ग्रामस्थ आणि भाविक करत आहेत . याबाबत पुरातत्व विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता  संपर्क होऊ शकला नाही .