On this day in history March 17  : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 17 मार्च रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. गोव्याचे माजी मुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री मनोहर पर्रिकर यांची आज पुण्यातिथी आहे. तर भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर कल्पना चावला यांचा जन्म आजच्याच दिवशी झाला आहे. आजच्याच दिवशी 1882 मध्ये विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचं निधन झाले होते. याशिवाय इतिहासात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.


विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे निधन -


आजच्याच दिवशी 1882 मध्ये विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचं निधन झाले होते. आधुनिक मराठी गद्द्याचे जनक, ग्रंथकार, केसरी चे संस्थापक होते.  मराठी भाषेतील अतुलनीय कामगिरीसाठी त्यांना ओळखलं जाते. शिवाजी महाराज हे चिपळूणकर यांचे आराध्य दैवत होते.


कल्पना चावला यांचा जन्म


भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर कल्पना चावला यांचा जन्म आजच्याच दिवशी 1962 मध्ये झाला होता.  कल्पना यांचा जन्म कर्नाल (हरियाणा ) येथे झाला. पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयात वैमानिक अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. एक फेब्रुवारी 2003 मध्ये  अमेरिकेचे स्पेस शटल कोलंबिया आपली अंतराळ मोहीम पूर्ण करून परतत असताना क्रॅश झाले. यामध्ये सात अंतराळवीरांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत अंतराळवीर कल्पना चावला यांचेही निधन झाले होते. 


मनोहर पर्रीकर यांची पुण्यतिथी -
 
गोव्याचे माजी मुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री मनोहर पर्रिकर यांचं आजच्याच दिवशी 2019 मध्ये पणजी येथे निधन झालं. साधं राहणीमान असलेले मनोहर पर्रिकर यांचं राजकाराणात वेगळेच वजन होते. स्वच्छ प्रतिमेमुळे गोव्याच्या राजकारणात तीन दशके दबदबा राखला होता.  त्यांनी तीन वेळा गोव्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळले. 2000 ते 2005, 2012 ते 2014 आणि 14 मार्च 2017 पासून निधनापर्यंत ते गोव्याचे मुख्यमंत्री होते. 2013 मध्ये  भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव मनोहर पर्रिकर यांनीच मांडला होता. त्यानंतर 2014 मध्ये त्यांच्याकडे संरक्षण मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. 


पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म -


महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म आजच्याच दिवशी 1946 मध्ये इंदोरमध्ये झाला होता. पृथ्वीराज चव्हाण यांचे वडील आनंदराव चव्हाण आणि आई प्रेमलाताई चव्हाण हे दोघेही काँग्रेसचे खंदे कार्यकर्ते होते. त्यामुळे राजकारणाचे बाळकडू पृथ्वीराज यांना लहानपणापासूनच मिळाले होते.  निष्कलंक, स्वच्छ चारित्र्य आणि अभ्यासू म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांची राजकारणात प्रतिमा आहे. केंद्रीय राजकारणात सर्वोच्च पदे, जबाबदाऱ्या त्यांनी भूषविल्या आहेत. 


रामचंद्र नारायण दांडेकर - 


भारतीय भाषातज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर यांचा आजच्याच दिवशी 1909 मध्ये साताऱ्यात जन्म झाला होता. त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने गौरवले होते. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून झाले. 'वैदिक मानव' ह्या विषयावर जर्मन भाषेत 'डेर वेदिश मेन्श 'हा प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळवली होती.


शेख मुजीबुर रहमान यांचा जन्म - 


मुजिबुर रहमान बांगलादेशचे पहिले राष्ट्राध्यक्ष व  पहिले पंतप्रधान होते. मुजिबुर रहमानला बंगबंधू नावानेही ओळखले जाते. मुजिबुर रहमानची मुलगी शेख हसीना वाजेद यांनीही बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळली होती.  बांग्लादेशच्या निर्मितीस कारणीभूत ठरले होते शेख मुजीबूर रहमान यांचे भाषण. शेख मुजीबूर रहमान यांच्या भडकाऊ भाषणामुळेच पाकिस्तानचे दोन तुकडे झाले अन् बांगलादेशची निर्मिती झाली होती. 


सायना नेहवाल यांचा जन्म - 


भारताची स्टार बॅडमिंटपटू सायना नेहवाल हिचा आज वाढदिवस आहे. सायनाचा जन्म 17 मार्च 1990 रोजी हिसारमध्ये झाला होता. 2012 मधील ऑलम्फिक स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये तिने पदकाला गवसणी घातली होता.  त्याशिवाय जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारी सायना ही पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. ऑलिम्पिक, BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि BWF वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप या प्रत्येक BWF प्रमुख वैयक्तिक स्पर्धेत किमान एक पदक जिंकणारी ती एकमेव भारतीय आहे. ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू आहे.


गावस्करांचा क्रिकेटला रामराम - 


भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपू सुनील गावस्कर यांनी आजच्याच दिवशी 1987 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता. कसोटीमध्ये दहा हजार धावांचा पल्ला पार करणारे ते पहिले फलंदाज होय. वेस्ट इंडिजच्या तेव्हाच्या भेदक माऱ्याला गावस्कर यांनी विना हेल्मेट सामना केला होता. त्यांनी भारतीय संघाचे नेतृत्वही केले. यापैकी 9 सामने भारताने जिंकले व 30 अनिर्णित राहिले होते. सलग 102 कसोटी सामने खेळण्याचा पराक्रम गावस्करांच्या नावावर आहे. त्याशिवाय कसोटीत तीन वेळा दोन्ही डावांत शतक झळकावण्याचा पराक्रमही त्यांनी केलाय. शंभरांहून अधिक धावांच्या 58 भागिदाऱ्या केल्या आहेत. 80 च्या दशकात त्यांनी 34 कसोटी शतकासह 10 हजार धावा चोपल्या होत्या. 


1997 मध्ये मुंबईमध्ये एसी (वातानुकूलित ) टॅक्सीच्या सेवेला सुरुवात झाली होती. 


1992 - मधल्या फळीतील एक उत्कृष्ट फलंदाज दिलीप वेंगसरकर यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती.


पुनीत राजकुमार यांचा जन्म -


दिवंगत कन्नड अभिनेते पुनीत राजकुमार यांचा जन्म आजच्याच दिवशी चेन्नईत 1975 मध्ये झाला होता. 29 ऑक्टोबर 2021 रोजी हृदयविकाराच्या झटक्यामुळे पुनीत यांचं निधन झाले होते. पुनित राजकुमार यांनी 29 पेक्षा जास्त कन्नड चित्रपटात अभिनय केला आहे.  बाल कलाकार म्हणून पुनित यांनी राष्ट्रीय पुरस्कार मिळवला होता. ‘अभी’, अप्पू, ‘वीरा कन्नडिगा’, ‘अजय’, ‘अरासु’, ‘राम’, ‘हुडुगारु’ आणि‘अंजनी पुत्र’ यासारख्या चित्रपटात काम केलं आहे.