17 March Headlines : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज चौथा दिवस आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा न निघाल्यामुळे आच चौथ्या दिवशी देखील संप सुरू आहे. याबरोबरच शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात काल शेतकऱ्यांचे शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली आहे. या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याची माहिती माजी आमदार जे. पी. गावीत यांनी दिली आहे. याबाबत मुख्यमंत्री आज सभागृहात निवेदन सादर करणार आहेत. 



शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री सभागृहात निवेदन सादर करणार


नाशिकवरून विधानभवनाच्या दिशेने निघालेल्या शेतकऱ्यांचा मोर्चा वाशिंदमध्ये पोहचला आहे. काल विधानभवनात मुख्यमंत्र्यांसोबत तीन तास सर्व विषयांवर चर्चा झाली आहे. चर्चेनंतर मोर्चा मागे घेण्यात येणार असल्याची माहिती मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्या माजी आमदार जे पी गावीत यांनी दिली आहे. परंतु, निर्णयांची अंमलबजावणी झाली नाही तर मोर्चा आहे तसाच सुरू राहणार आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सर्वांसदर्भात सभागृहात निवेदन सादर करणार आहेत. 


 राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज चौथा दिवस
 
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज चौथा दिवस आहे.  जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे सर्व सामान्य जनतेची शासकीय कार्यालयातील कामे अडकून पडल्याने अनेक नागरिक शासकीय कार्यालय येथे फेऱ्या मारत आहेत. 
 
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांची कोठडी आज संपणार
 
दारु घोटाळ्यात ईडीच्या अटकेत असलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांची कोठडी आज संपत आहे. दुपारी 12 वाजता सिसोदीया यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. 


केंद्रीय कॅबिनेटची मिटींग


आज संध्याकाळी 6.30 वाजता पंतप्रधानांच्या दिल्ली येथील निवासस्थानी केंद्रीय कॅबिनेटची मिटींग होणार आहे.


काँग्रेसच्या निवडणूक समितीची  


कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसच्या निवडणूक समितीची बैठक होणार आहे.  


कृषी योजनांच्या जागरासाठी आजपासून सांगलीत 3 दिवस कृषी महोत्सव  


कृषी योजनांच्या जागरासाठी आजपासून सांगलीत 3 दिवस कृषी महोत्सव सुरू होत आहे. या कृषी प्रदर्शनात 200 पेक्षा जास्त स्टॉल असून यामध्ये पौष्टिक तृणधान्य पिकाच्या उत्पादन वाढीबरोबरच या पिकांच्या आरोग्यविषयक फायद्याबाबत जनजागृती करून लोकांच्या आहारातील त्यांचे प्रमाण वाढविणे या प्रमुख उद्देशाने महोत्सवामध्ये पौष्टिक तृणधान्य पिकासाठी स्वतंत्र दालन उभारण्यात आले आहे. यामध्ये पौष्टिक तृणधान्य उपपदार्थांचे प्रदर्शन व विक्री, पौष्टिक तृणधान्य सेल्फी पॉईंट, पौष्टिक तृणधान्याबाबत आहार तज्ज्ञांचा परिसंवाद, पाककला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.