On this day in history june 30 : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 30 जून रोजी रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. आजच्या दिवशी 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्याला लागला होता. त्याशिवाय भारताच्या राजकारणातील भीष्माचार्य दादाभाई नौरोजी यांचं 1917 मध्ये निधन झाले होते.याशिवाय इतिहासात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.


30 जून 2022 - एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला -


एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे 20 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 40 आमदारांना सोबत घेत शिवसेनेतून बंड केले, त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं होतं. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर शिवसेना पक्षासाठी ठाकरे आणि शिंदे यांच्यात लढाई झाली, निवडणूक आयोगाने शिंदेंच्या बाजूने निर्णय दिला. शिवसेना आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना मिळाला.  एकनाथ शिंदे म्हणजे, कडवट शिवसैनिक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे खंदे कार्यकर्ते होय. आनंद दिघेंसोबत आपला राजकीय प्रवास सुरु करणारे एकनाथ शिंदे गेली अनेक वर्षे शिवसेनेसोबत सक्रिय राजकारणात आहेत. आनंद दिघेंनंतर ठाण्यात शिवसेना वाढवण्याचं काम एकनाथ शिंदेंनी एकहाती केलं. 


विनायक मेटे यांची जयंती - 


30 जून  1970 रोजी शिवसंग्राम पार्टीचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा बीडमध्ये जन्म झाला होता. मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनातील मेटे हे महाराष्ट्रातील प्रमुख नेते होते. मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी अनेकदा आंदोलनं केली. अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे ते अध्यक्ष देखील होते. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगावचे रहिवासी होते. सर्वप्रथम शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात आमदार होते. त्यानंतर सलग पाच टर्म विधानपरिषद सदस्य होते.


दादाभाई नौरोजी यांचं निधन -


दादाभाई नौरोजी यांचं 30 जून 1917 मध्ये निधन झाले होते. त्यांना भारताच्या राजकारणातील भीष्माचार्य म्हणूनही ओळखले जाते. दादाभाई नौरोजी ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये निवडून येणारे पहिले आशियाई नेते होते. पण त्यांची ओळख एवढीच नाही. महात्मा गांधी यांच्याआधीचे ते देशातील प्रमुख नेते होते. जगभरात त्यांना जातीयवाद आणि साम्राज्यवादाविरोधात लढणारे नेते, म्हणूनही मान होता. स्वातंत्र्यलढ्याचा पाया रचणाऱ्या आर्किटेक्ट म्हणून पाहिले जाणारे दादाभाई एक महान स्वातंत्र्यसेनानी होते. पारशी समाजाचे विचारवंत, शिक्षणतज्ञ, व्यापारी आणि समाजसुधारक दादाभाई नौरोजी हे 1886 आणि 1893 मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष होते.


ब्राझिलने विश्वचषक जिंकला -


2002 मध्ये आजच्याच दिवशी ब्राझिलने फुटबॉल विश्वकप जिंकला होता. फायनलमध्ये ब्राझिलने 2-0 च्या फरकाने जर्मनीचा पराभव केला होता. ब्राझिलचा हा पाचवा विश्वकप होता. रोनाल्डोला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आले होते. सर्व फिफा विश्वचषकांमध्ये खेळणारा ब्राझील हा एकमेव संघ आहे, त्यामुळे ब्राझीलशिवाय फिफा विश्वचषक अपूर्ण आहे अशी म्हण सुरु झाली. 


माईक टायसनचा जन्म -


अमेरिकेचा माजी स्टार बॉक्सर माइक टायसन याचा जन्म 30 जून 1966 रोजी अमेरिकेत झाला होता. सर्वात कमी वयात टायसन याने WBC, WBA आणि IBF यासारखे पुरस्कार पटकावले आहेत. बॉक्सिंगच्‍या विश्‍वात एकेकाळी अधिराज्‍य गाजवणारा आणि प्रतिस्‍पर्ध्‍याच्‍या मनात धडकी भरविणाऱ्या टायसनचं करिअरही वादग्रस्त राहिलेय. बॉक्सिंग हा खेळ भारतात तितका प्रसिद्ध नसला तरी माईक टायसन हे नाव सर्वांनाच माहीत आहे. त्याने केलेल्या फाईट्स आजही आवडीने पाहिल्या जातात.


बाळ कोल्हटकर यांचं निधन - 


जेष्ठ नाटककार, निर्माते, दिग्दर्शक, कवी-गीतकार आणि अभिनेते असलेल्या ‘बाळ कोल्हटकर यांचं आजच्याच दिवशी (30 जून 1994)निधन झाले होते. 25 सप्टेंबर 1926 रोजी साताऱ्यात त्यांचा जन्म झाला होता. कुटुंबप्रधान कथा, काळजाला भिडणारी गीते आणि संवाद, सामाजिक बांधिलकी जपणारे विषय ही त्यांच्या नाटकांची वैशिष्ट्ये. उठी उठी गोपाळा, निघाले आज तिकडच्या घरी, तू जपून टाक पाऊल जरा, आली दिवाळी दिवाळी, आई तुझी आठवण येते ही त्यांच्या नाटकांमधील काही प्रसिद्ध गीतं.


नॅशनल ऑरगनायझेशन फॉर वुमन - 
आजच्याच दिवशी 1966 मध्ये अमेरिकेतील सर्वात मोठ्या स्त्रीवादी संस्था नॅशनल ऑरगनायझेशन फॉर वुमन याची स्थापना झाली. 


तात्काळ दूरध्वनी क्रमांक -


1937 मध्ये आजच्याच दिवशी जगातील पहिला तात्काळ दूरध्वनी क्रमांक सुरु झाला होता. लंडनमध्ये आजच्याच दिवशी 999 हा तात्काळ क्रमांक सुरु करण्यात आला होता. त्यानंतर इतर देशांमध्येही अशे तात्काळ क्रमांक सुरु करण्यात आले.  


नायगारा धबधबा दोरीवरुन पार -


जगातील सर्वात मोठ्या धबधब्यांपैकी एक असणारा जगप्रसिद्ध नायगारा धबधबा 30 जून 1959 रोजी  चार्ल्स ब्लांडिन यांनी एका दोरीवरुन पार केला होता.  अशी कामगिरी करणारा तो पहिलाच साहसवीर ठरला होता. तब्‍बल 1800 फूट लांबीच्‍या दोरीवरुन त्‍याने नायगारा धबधबा पार केला.  


दोड्डा गणेशचा जन्म - 


भारताचा माजी क्रिकेटपटू दोड्डा गणेश याचा आजच्या दिवशी बेंगलोरमध्ये जन्म झाला होता. दोड्डा गणेश याने 1997 मध्ये भारताकडून चार कसोटी आणि एक वनडे सामना खेळला आहे.  चार कसोटीत त्याने पाच विकेट घेतल्या आहेत. तर वनडेमध्ये त्याच्या नावावर एक विकेट आहे. 


सनथ जयसूर्या याचा जन्म -


श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू सनथ जयसूर्या याचा आजच्या दिवशी 1969 मध्ये जन्म झाला होता. 110 कसोटी सामन्यात जयसूर्याने 6973 धावा केल्या आहेत. 445 वनडे सामन्यात 13430 धावा चोपल्या आहेत. 31 वनडे सामन्यात 625 आणि 30 आयपीएलमध्ये 768 धावांचा पाऊस पाडलाय. जयसूर्याच्या नावावर 42 शतकांची नोंद आहे.


1978 : अमेरिकेच्या संविधानात 26 वा बदल संमत झाला त्यामुळे मतदानाचे वय 18 वर्षे झाले.