On this day 25 February: इतिहासात 25 फेब्रुवारी या दिवशी अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. या तारखेला ऑस्ट्रेलियाचे महान आणि चमत्कारी फलंदाज डॉन ब्रॅडमन यांचे निधन झाले. याच तारखेला हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते डॅनी डॅनझोंगपा, दिव्या भारती आणि शाहिद कपूर यांचा जन्म झाला. या तारखेला घडलेली आणखी एक मोठी घटना भारताशी संबंधित नसून सत्तेच्या शिखरावर बसलेल्या लोकांसाठी ती एक धडा आहे. सत्तेचा आणि अधिकाराचा दुरुपयोग करणारे अनेक हुकूमशहा जगाने पाहिले आहेत. आपल्या अधिकाराला कोणी आव्हान देऊ शकत नाही असं त्यांना वाटतं. पण हिटलरपासून मुसोलिनीपर्यंत सगळ्यांचाच शेवट वाईट झाला आहे. या एपिसोडमध्ये आणखी एका हुकूमशहाचे नाव येते, ते फर्डिनांड मार्कोसचे. फिलीपिन्सवर 21 वर्षे हुकूमशहा म्हणून राज्य करणारे अध्यक्ष फर्डिनांड मार्कोसला आजच्याच दिवशी सत्ता सोडून, देश सोडून पळून जावे लागले. 


1586- बिरबलचा मृत्यू


मुघल सम्राट अकबराच्या दरबारातील मुख्य वजीर आणि अकबराच्या नवरत्नांपैकी म्हणजे नऊ सल्लागारांपैकी एक अशा महेश दास म्हणजेच बिरबलचा (Birbal) 25 फेब्रुवारी 1586 रोजी मृत्यू झाला. बिरबलचा जन्म एका ब्राह्मण कुटुंबात झाला होता. महर्षी कवी यांचे वंशज असलेला बिरबरल हा लहानपणापासूनच अतिशय हुशार होता. अकबराच्या दरबारातील त्याच्या बुद्धीचातुर्याच्या अनेक सुरस कथा आजही चर्चिल्या जातात. अकबराने स्थापित केलेला दीन-ए-ईलाही धर्म स्वीकारणारा तो एकमेव हिंदू होता.


फेब्रुवारी 1586 मध्ये, वायव्य भारतीय उपखंडातील म्हणजेच अफगाणिस्तानमधील बंडखोरी मिटवण्यासाठी अकबराने बिरबलच्या नेतृत्वाखाली सैन्याला पाठवलं. पण बंडखोरांनी केलेल्या एका हल्ल्यात बिरबरचा दुर्दैवी मृत्यू झाला.  करण्यासाठी बिरबलने सैन्याचे नेतृत्व केले, जेथे बंडखोर टोळीने केलेल्या हल्ल्यात तो अनेक सैनिकांसह मारला गेला. 


1894- गुढवादी मेहेर बाबा यांचा जन्म 


मेहेर बाबा हे भारतीय गूढवादी आणि आध्यात्मिक गुरू होते. 25 फेब्रुवारी 1894 रोजी त्यांचा जन्म झाला. विशिष्ट हातवारे किंवा मुळाक्षरांचा फलक वापरून ते संवाद साधत. 1954 मध्ये आपण या युगातील अवतार आहोत अशी जाहीर घोषणा त्यांनी केली होती.


1948: अभिनेते डॅन डेन्झोंग्पा यांचा जन्म


भारतीय चित्रपटांच्या इतिहासात ज्या काही हाताच्या बोटावर मोजण्याइतपत कलाकारांनी खलनायकाची भूमिका साकारली आणि नाव कमावलं त्यामध्ये डॅन डेन्झोंग्पा (Danny Denzongpa) यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. 
डॅनी डेन्झोंग्पा हे भारतीय चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक आहेत. आपल्या 40 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी सुमारे 190 हिंदी चित्रपटांतून अभिनय केला आहे. याशिवाय त्यांनी नेपाळी, तमिळ, तेलुगू आणि बंगाली चित्रपटांतूनही अभिनय केला आहे.


1974: सौंदर्यवती अभिनेत्री दिव्या भारतीचा जन्म 


अभिनेत्री दिव्या भारती (Divya Bharti) ही हिंदी चित्रपटांमधील अभिनेत्री होती जिच्या सौंदर्याचे चाहते जगभर होते. 25 फेब्रुवारी 1974 रोजी मुंबई येथे तिचा जन्म झाला. दिव्या भारतीने 1990 मध्ये तेलुगू चित्रपट 'बोबिली राजा'मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 'विश्वात्मा' या हिंदी चित्रपटातून तिला प्रसिद्धी मिळाली. याच चित्रपटातील 'सात समुंदर पार' (Saat Samundar Paar) या गाण्याने तिला वेगळी ओळख मिळाली. 1992 पर्यंत भारतीने बॉलिवूडमध्ये एक यशस्वी नायिका म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली होती. 1992 मधील 'दीवाना' मधील अभिनयामुळे तिला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण पुरस्कार मिळाला. 1992-1993 च्या मध्यापर्यंत, भारतीने वयाच्या 19 व्या वर्षी 14 हिंदी आणि सात दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम केले होते. 1993 मध्ये त्यांच्या रहस्यमय मृत्यूने तिची कारकीर्दही संपुष्टात आली.


1981: बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर याचा जन्म 


बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) याचा जन्म 25 फेब्रुवारी 1981 रोजी मुंबईत झाला. शाहिद कपूरने आपल्या करिअरची सुरुवात म्युझिक व्हिडिओ आणि जाहिरातींमधून केली. सुभाष घई यांच्या 'ताल' मध्ये शाहिद कपूरने पहिल्यांदा साईड डान्सर म्हणून काम केलं. त्यानंतर इश्क विश्क (2003) मधून मुख्य अभिनेता म्हणून काम केले आणि त्याच्या अभिनयासाठी फिल्मफेअर पुरस्कारही पटकावला.  फिदा (2004) आणि शिखर (2005) यांसारख्या चित्रपटांमधील त्याच्या अभिनयासाठी कौतुक झालं. त्याला पहिले व्यावसायिक यश सूरज बडजात्याच्या विवाह (2006) मध्ये मिळाले.  नंतर त्याने 'जब वी मेट' हा सुपर हिट चित्रपट दिला. शाहिद कपूर हा बॉलिवूडमधील एक यशस्वी कलाकारांपैकी आहे. 


1986 : फिलिपिन्सचा हुकूमशाह फर्डिनांड मार्कोस देश सोडून पळाला


फिलिपिन्सवर 21 वर्षे राज्य करणारा हुकूमशाह फर्डिनांड मार्कोसला (Ferdinand Marcos) लोकांनी केलेल्या बंडामुळे देश सोडावा लागला. 25 फेब्रुवारी 1986 रोजी त्याने फिलिपिन्स सोडला आणि तो अमेरिकेला पळून गेला. फर्डिनांड मार्कोस यांनी सुमारे 21 वर्षे देशावर राज्य केले. त्याच्या कारकिर्दीत मोठ्या प्रमाणात प्रशासकीय भ्रष्टाचार, राजकीय दडपशाही व मानवी हक्कांची पायमल्लीही घडली. मार्कोसने देशात मार्शल लॉ लागू केला आणि फिलिपिन्सच्या इतिहासातील सर्वात भयंकर काळ असं त्याचं वर्णन केलं जातंय. मार्कोसच्या राजवटीत 70,000 लोकांना तुरुंगात पाठवण्यात आले, 34,000 लोकांना छळण्यात आले आणि 3,240 लोक मारले गेले. अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने ही आकडेवारी दिली आहे. खरी आकडेवारी याच्या कितीतरी पटीने जास्त आहे. 


1988: जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या पृथ्वी मिसाईलचे यशस्वी परीक्षण 


आज भारताचे क्षेपणास्त्र तंत्रज्ञान जगात आधुनिक आणि प्रगत तर आहेच, पण ते स्वयंपूर्णही आहे. पण स्वावलंबनाचा हा प्रवास खूप मोठा आहे. यापैकी एक महत्त्वाचा दिवस म्हणजे 25 फेब्रुवारी 1988. याच दिवशी भारताने पहिल्यांदा पृथ्वी क्षेपणास्त्राची (Prithvi Missile) यशस्वी चाचणी केली. त्याची मारक क्षमता 150 किमी इतकी होती. भारतीय सुरक्षा यंत्रणेसाठी ही एक मोठी उपलब्धी होती. कारण देशाने संपूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने जमिनीपासून पृष्ठभागावर मारा करणारे क्षेपणास्त्र बनवून जगात खळबळ माजवली होती. नंतरच्या काळात पृथ्वी मिसाईलच्या तंत्रज्ञानात विकास होत गेला. 


2001- महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांचे निधन 


जेव्हा जेव्हा क्रिकेटमध्ये जगातील सर्वोत्तम फलंदाजाची चर्चा होते तेव्हा डॉन ब्रॅडमन (Don Bradman) यांचे नाव न चुकता घेतले जाते. या ऑस्ट्रेलियन फलंदाजाच्या विक्रमाचा डोंगर इतका उंच होता की तो पार करण्यासाठी जगातील सर्वोत्तम फलंदाजांना बरीच वर्षे लागली. 25 फेब्रुवारी 2001 रोजी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेणारे सर डोनाल्ड जॉर्ज ब्रॅडमन यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 99.94 च्या सरासरीने 6,996 धावा केल्या. आजपर्यंत एकाही फलंदाजाला त्याची सरासरी गाठता आलेली नाही. ब्रॅडमन यांनी 1928 ते 1948 दरम्यान इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये प्रत्येक डावात 100 धावा करत एकूण 19 शतके झळकावली. 1930 मध्ये इंग्लंडच्या पहिल्या दौऱ्यात त्यांनी 334 धावांची विक्रमी वैयक्तिक धावसंख्या केली. हा विक्रम नंतर मोडला गेला, पण त्यावेळी एका डावात त्रिशतक झळकावणं हे स्वप्नवत होतं. त्यांनी 1934 मध्येही इंग्लंडविरुद्ध 304 धावा करत या पराक्रमाची पुनरावृत्ती केली.


2010: भारत पाकिस्तानमध्ये पुन्हा चर्चेला सुरुवात 


26 नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर भारताने त्या देशासोबतचे सर्व संबंध तोडून टाकले. नंतर 25 फेब्रुवारी रोजी या दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट झाली आणि चर्चेला पुन्हा सुरुवात झाली.