17 April In History :  प्रत्येक दिवसाचे काही वैशिष्ट्य, ऐतिहासिक महत्त्व असते. भारताच्या संसदीय लोकशाहीसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी 17 एप्रिल 1952 रोजी पहिली लोकसभा अस्तित्वात आली होती. देशाचे माजी उपराष्ट्रपती  डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज स्मृतीदिन आहे. तर, आज जागतिक हिमोफिलिया दिन आहे. 



जागतिक हिमोफिलिया दिन World Hemophilia Day 2023


17 एप्रिल हा जागतिक हेमोफेलिया दिन म्हणून संपूर्ण जगात पाळला जातो. हेमोफेलिया हा आनुवंशिक आजार आहे. ज्यात शरीरात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव वाढतो. एखाद्या व्यक्तीला जर हेमोफेलिया हा आजार झाला असेल तर इजा झालेल्या भागात अंतर्गत रक्तस्त्राव होतो. त्यातून त्या भागाला सूज येते. पण, अनेकदा हा आजार दूर्लक्षित राहिल्याने किंवा या विषयी जनजागृती नसल्याने 80 टक्के लोकांना या आजाराबाबतची माहितीच नसते. तसंच राज्यातील जवळपास 3 हजारांहून अधिक रुग्ण हेमोफेलियाने ग्रस्त आहेत.



1790: बेंजामिन फ्रॅंकलिन यांचे निधन


बेंजामिन फ्रॅंकलिन हे एक अमेरिकन वैज्ञानिक, संशोधक, पत्रकार, लेखक, राजकारणी असे बहुआयामी व्यक्ती होते. विजेच्या शक्तीविषयी महत्त्वाचा शोध लावणारे अमेरिकेतील थोर शास्त्रज्ञ होते.  फ्रँकलिन यांनी आपल्या संशोधनाचे कधीही पेटंट घेतले नाही.  फ्रँकलिन हे अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामाचे लिखाण करणाऱ्या लेखकांपैकी एक होते. ब्रिटिशांपासून अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या करारावर स्वाक्षरी करणाऱ्या नेत्यांपैकी एक होते.
 


1820: बेसबॉलचे जनक अलेक्झांडर कार्टराईट यांचा जन्म


अमेरिकेतील न्यू यॉर्कमधील अलेक्झांडर कार्टराईट यांनी 1845 मध्ये आधुनिक बेसबॉलचा शोध लावला. अलेक्झांडर कार्टराईट आणि न्यू यॉर्क निकेरबॉकर बेस बॉल क्लबच्या सदस्यांनी बेसबॉलच्या आधुनिक खेळासाठी स्वीकारलेले प्रथम नियम व नियम तयार केले होते.


1952: भारताची पहिली लोकसभा अस्तित्वात आली


भारताची पहिली लोकसभा 1951 च्या सार्वजनिक निवडणुकीनंतर 17 एप्रिल 1952 रोजी अस्तित्वात आली. 1957 मध्ये 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर ती विसर्जित केली गेली. पहिल्या लोकसभेच्या अध्यक्षपदी गणेश वासुदेव मावळणकर हे अध्यक्ष होते. पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीद्वारे, तत्कालीन मुंबई प्रांतात असलेल्या अहमदाबादमधून लोकसभेवर निवडून गेलेले खासदार होते. पहिल्या लोकसभेचे नेते, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते. तर, विरोधी पक्ष नेतेपदी कम्युनिस्ट पक्षाचे नेते ए.के. गोपालन होते. 


1975 : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे निधन


भारताचे दुसरे राष्ट्रपती, पहिले उपराष्ट्रपती आणि तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज स्मृतीदिन आहे. त्यांच्या गौरवार्थ त्यांचा जन्मदिन हा भारतात ’शिक्षक दिन’ म्हणून ओळखला जातो.त्यांनी 1962  ते 1967 पर्यंत भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून आणि 1952 ते 1962 पर्यंत भारताचे पहिले उपराष्ट्रपती म्हणून काम केले. ते 1949 ते 1952 पर्यंत सोव्हिएत युनियनमधील भारताचे दुसरे राजदूत देखील होते. 


राधाकृष्णन यांना त्यांच्या आयुष्यात अनेक उच्च पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. 1931 मध्ये नाइटहूड, 1954 मध्ये भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला भारतरत्न आणि 1963 मध्ये ब्रिटिश रॉयल ऑर्डर ऑफ मेरिटचे मानद सदस्यत्व त्यांना बहाल केले गेले.