पुणे : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. ज्योतिबा फुले यांच्यासह सावित्रीबाईंनी मुलींसाठी पुण्यातील भिडे वाड्यात 1848 ला पहिली शाळा सुरू केली होती. त्याच भिडे वाड्याची आज दुरवस्था झाली आहे. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्यासह राज्य सरकारकडूनही भिडे वाड्याकडे दुर्लक्ष होत आहे.
भारतातील स्त्री शिक्षणाचा पाया भिडे वाड्यात घातला गेला. मात्र जिथं हा इतिहास घडला, त्या इमारतीचा पाया मात्र आज खचला आहे. तात्याराव भिडे यांनी त्यांच्या चौसोपी वाड्यातील काही भाग ज्योतिबा आणि सावित्रीबाईंना शाळा चालवण्यासाठी दिला आणि इथं स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. पुढं भिडे वाडा म्हणून ओळखली गेलेली ही वास्तू अतिशय धोकादायक अवस्थेत कशीबशी तग धरून उभी आहे. या पडक्या वाड्याच्या समोरुन जाणाऱ्या लोकांना इथं घडलेल्या इतिहासाची जराही कल्पना नाही.
भिडे वाड्याचं राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करण्याची घोषणा होऊन काळ लोटला आहे. मात्र सावित्रीबाईंनी जिथं मुलींना शिक्षणाचे धडे दिले, ती ही वास्तू अजूनही उपेक्षितपणे उभी आहे. हा उपेक्षितपणा फक्त राज्यकर्त्यांकडूनच नाही तर ज्यांच्यासाठी सावित्रीबाईंनी अनेक हाल अपेष्टा खाऊन शिक्षणाची गंगा इथं आणली त्या महिलांकडून देखील अनुभवायला येत आहे.
भिडे वाड्याचा खालचा भाग जुन्या मालकाने काही दुकानदारांना विकला आहे. त्यामुळे वाड्याची पुनर्बांधणी करुन तिथं राष्ट्रीय स्मारक करण्याच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. महापालिकेकडून त्या बाबतीत आवश्यक त्या कायदेशीर बाबींची पूर्तता वर्षानुवर्षे होत नसल्याने गेली अनेक वर्ष भिडे वाड्याचा विषय न्यायालयात रखडला आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना हा वाडा सापडणं अवघड झालं आहे.
सावित्रीबाईंच्या नावाने आज अनेक संस्था - संघटना आहेत. सामाजिक आणि राजकीय सभा सावित्रीबाई आणि महात्मा फुलेंच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होत नाहीत. मात्र जिथं या सगळ्याचा उगम झाला ती ऐतिहासिक वास्तू मात्र दुर्दैवाने हलाखीच्या अवस्थेत उभी आहे.
सावित्रीबाईंच्या पहिल्या शाळेची दुरवस्था
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे
Updated at:
03 Jan 2019 04:23 PM (IST)
भिडे वाड्याची आज दुरावस्था झाली आहेच पण सावित्रीबाईंमुळे ज्यांना शिक्षणाची दारं खुली झाली त्या महिलांनाही सावित्रीबाईंच्या या कामाचा विसर पडला आहे. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्याकडूनही भिडे वाड्याकडे दुर्लक्ष होत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -