Omicron Cases In Maharashtra : जगभरात चिंतेचा विषय ठरलेल्या कोरोनाच्या ओमायक्रॉनव्हेरियंटने महाराष्ट्रातील  ग्रामीण भागात शिरकाव केला आहे. शनिवारी साताऱ्यातील फलटणमध्ये ओमायक्रॉनचे तीन रुग्ण आढळले आहेत. तर एका रुग्णाचा अहवाल प्रतिक्षेत आहे. यामुळे साताराकरांची चिंता वाढली आहे. 


गेल्या काही दिवसांमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये साडेतीनशे पेक्षा जास्त लोक विदेशातून आले आहेत. यामधील एकाच कुटुंबातील चार जण पॉझिटिव्ह आढळले होते. यांचे जीनोम सिक्वेन्सिंग तपासणीसाठी पुण्यात पाठवले होते. पुण्याच्या राष्टीय विषाणू संस्था यांच्याकडून शनिवारी अहवाल प्राप्त झाला. यामध्ये तीन जणांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. जिल्ह्यात ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने खडबडून जागे झालं असून संपर्कातील लोकांची तपासणी सुरु केली आहे. तसेच संशयित रुग्णांचे अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत.


 देशातील सर्वाधिक ओमायक्रॉनचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. साताऱ्यात ओमायक्रॉनचे तीन रुग्ण आढळल्यामुळे राज्यातील एकूण बाधितांची संख्या 43 वर पोहचली आहे. यामधील 25 जणांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे. इतरांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. काही रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं आढळली आहेत. तर काही रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं आढळलेली नाहीत. 


ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये 'हे' प्रमुख लक्षण
आतापर्यंतच्या परिणामांवरून असे दिसून आले आहे की कोरोनाच्या सुरुवातीच्या प्रकारांच्या तुलनेत ओमायक्रॉन या व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये लक्षणे कमी गंभीर असल्याचे आढळून आले आहे. मात्र सर्व ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांमध्ये घसा खवखवणे हे समान लक्षण आढळून आले आहे. क्षिण आफ्रिकेमधील (South Africa) डिस्कव्हरी हेल्थ संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रायन नॉच यांनी सांगितले की, ''ओमायक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांमध्ये आढळलेली काही लक्षणे इतर व्हेरियंटपेक्षा वेगळी असल्याचे समोर आले आहे. यामध्ये घसा खवखवणे हे एक लक्षण समान असल्याचे डॉ. नॉच यांनी म्हटले आहे. यासह नाक कोंदणे, कोरडा खोकला आणि पाठ दुखणे ही लक्षणेही आढळली आहेत.'' डॉ. रायन नॉच यांनी पुढे सांगितले की, ''यापैकी बहुतेक लक्षणे सौम्य आहेत. परंतु याचा अर्थ असा नाही की ओमायक्रॉन कमी धोकादायक आहे असा नाही.'' 


राज्य सरकारची नियमावली
गर्दी टाळण्यासाठी  विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये. 
जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये घ्यावी.
एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये 6 फूट अंतर, तसेच एका वर्गात जास्तीत जास्त 15-20 विद्यार्थी हवेत.
हात सतत साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास नजीकच्या आरोग्य केंद्रामध्ये पाठविणे 
विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तत्काळ शाळा बंद करुन शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करुन घ्यावी, 
शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांनी नियमित शाळांना भेटी देऊन आढावा घ्यावा.